होमपेज › Pune › राज्यातील १७ दूध संघांना नोटिसा : सहनिबंधक शिरापूरकर 

राज्यातील १७ दूध संघांना नोटिसा : सहनिबंधक शिरापूरकर 

Published On: May 04 2018 1:50AM | Last Updated: May 04 2018 12:22AMपुणे : प्रतिनिधी

राज्यातील गाईच्या दुधाच्या खरेदी दरात लिटरला 3 रुपये वाढ करुन हा दर 24 वरुन 27 रुपये करण्यात आला. असे असतानाही शेतकर्‍यांना हा दर दिला जात नसल्यामुळे पुणे विभागातील 17 सहकारी दूध संघांना सहकारी संस्थांचे विभागीय सह निबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांनी नोटिसा बजावल्या आहेत. तर संचालक मंडळ बरखास्त आणि कार्यकारी संचालकांना पदमुक्त करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत पुणे विभागातील 12 सहकारी संघांच्या सुनावण्या बुधवारी (दि.2) येथील प्रादेशिक दुग्ध विकास अधिकार्‍यांच्या कार्यालयात झाल्या. त्यामध्ये सांगली आणि सातारा जिल्ह्यातील सहकारी दूध संघांचा समावेश आहे. 

सांगली जिल्ह्यातील कडेगांव येथील सोनहिरा सहकारी दूध संघ, तासंगावचा वसंतदादा दूध संघ, इस्मालपूर येथील राजाराम बापू सहकारी दूध संघ, मिरज येथील मोहनराव शिंदे, कवठे महांकाळ येथील शेतकरी सहकारी दूध संघ, विटा येथील लोकनेते हणमंतराव पाटील सहकारी दूध संघ, शिराळा येथील फत्तेसिंगराव नाईक दूध संघ अशा 7 संघांचा समावेश आहे.

याशिवाय सातारा जिल्ह्यातील सातारा जिल्हा सहकारी दूध संघ, पाटण तालुका सहकारी दूध संघ, फलटण तालुका सहकारी दूध संघ, कराड येथील कोयना सहकारी दूध संघ, पाटण येथील शिवशंभो सहकारी दूध संघ अशा 5 मिळून एकूण 12 सहकारी दूध संघांचा समावेश आहे.