Tue, Nov 13, 2018 23:28होमपेज › Pune › डेंग्यूप्रकरणी १४७० जणांना नोटिसा

डेंग्यूप्रकरणी १४७० जणांना नोटिसा

Published On: Jun 24 2018 1:35AM | Last Updated: Jun 24 2018 12:38AMपुणेः प्रतिनिधी

डेंग्यूची निर्मिती न होऊ देणे हे केवळ महापालिकेच्या आरोग्य विभागाचे काम नाही. प्रत्येकाच्या घरात जाऊन महापालिका डेंग्यूबाबत तपासणी करू शकत नाही. म्हणून, डेंग्यू निर्मूलन करणे हे प्रामुख्याने नागरिकांचे काम असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे; तसेच यावर्षी वारंवार सांगूनही न ऐकणार्‍या 1 हजार 470 मिळकतींना नोटिसा पाठवल्या आहेत. 

शहरात मान्सून बरसू लागला आहे. त्यामुळे परिसरातील खड्ड्यात व सोसायट्यांमधील टेरेस, गार्डन, पार्किंग व अडगळीच्या ठिकाणी पाणी साचू शकते. तसेच शहाळे, टायर, डबे असतील तर त्यामध्येही पाणी साचते. या साचलेल्या स्वच्छ किंवा घाण पाण्यात डेंग्यू डासांची उत्त्पत्ती होते. जून महिन्यात डेंग्यू डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे डासांचे रुग्णही वाढले आहेत. याबाबत कीटक प्रतिबंधक विभागाने आतापर्यंत तीन जणांवर खटले भरले आहेत, तर बाराशे रुपयांचा दंडही वसूल केला आहे.  

कीटक प्रतिबंधक विभागाने डेंग्यूप्रकरणी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. महिन्याभरात 1470 जणांना नोटिस बजावल्या आहेत. शहरात सध्या डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणावर नसली तरी सर्वत्र डासांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. दिवसा असणार्‍या डासांबरोबर रात्रीच्या वेळीही डासांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. दरम्यान, याबाबत पालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे म्हणाले, पालिकेने याबाबत सर्व शासकीय कार्यालयांचे प्रमुख यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच जनजागृतीपर पत्रके, भित्तिपत्रके लावण्यात आले आहेत. कीटक प्रतिबंधक विभागाच्या वतीने डास आढळतील त्या ठिकाणी कीटकनाशके टाकण्याचे काम सुरू आहे; तसेच अबेटमेंट कमिटीची स्थापना केली असून, त्याच्या बैठकाही झाल्या आहेत. त्यानुसार सर्व ठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे.