Sat, Apr 20, 2019 09:55होमपेज › Pune › एक लाख धारकांना ‘प्राप्तिकर’च्या नोटिसा

एक लाख धारकांना ‘प्राप्तिकर’च्या नोटिसा

Published On: Feb 09 2018 2:01AM | Last Updated: Feb 09 2018 1:38AMअमोल येलमार

पिंपरी : देशामध्ये ‘बिटकॉईन’ने धुमाकूळ घातला आहे. गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. यातच शासनानेही याकडे गांभीर्याने लक्ष घातले आहे. प्राप्तिकर विभागाने ‘बिटकॉईन’सारख्या ‘क्रिप्टो’ चलनांमध्ये गुंतवणूक केलेल्या सुमारे एक लाख गुंतवणूकदारांना नोटिसा जारी केल्या आहेत, तर संबंधित प्रश्‍नांवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने एक समिती स्थापन केली असून, 31 मार्चपर्यंत त्याचा अहवाल सादर करण्यास सांगितलेला आहे.

अनेकांनी या आभासी (‘क्रिप्टो’) चलनात गुंतवणूक केली असून, कर भरताना मिळालेले उत्पन्न त्यांनी जाहीर केले नसल्याचे समोर आले आहे. गुंतवणुकीद्वारे मिळालेल्या नफ्यावर कर लावला जात नाही. प्राप्तिकर विभागाने ‘क्रिप्टो करन्सी एक्स्चेंजेस’वर विविध सर्वेक्षण केले आहे.  किती लोक नियमित सहभागी आहेत, किती जण स्वतः नोंदणीकृत आहेत आणि त्या व्यासपीठावर किती व्यापार केले आहेत, याबाबत तपासणी केली जात आहे. यामध्ये अनेक लोकांच्या गुंतवणुकीत स्पष्टता नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भारतातील प्राकर विभागास संबंधितांना नोटिसा देण्याच्या सूचना दिल्याचे वृत्त आहे. प्राप्तिकर विभागाकडून आणखी माहिती घेण्याचे काम सुरू आहे. यामध्ये आढळून आलेल्या गुंतवणूकदारांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत.

2009 साली चार-पाच रुपयांना मिळणारे हे चलन अवघ्या दहा वर्षांत 14 लाख रुपयांपर्यंत पोचले होते. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहण्यात आले. केंद्र शासनाने हे व्यवहार बेकायदेशीर असल्याचे सांगून, वेगवेगळ्या प्रकारे कारवाया सुरू केल्या. यामुळे चौदा लाख रुपयांवर गेलेला हा कॉईन नोव्हेेंबर 2017 पासून घसरू लागला. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, खरेदी करणार्‍यांचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे सध्या ‘बिटकॉईन’चे व्यवहार थंडावल्याचे दिसत आहे.

‘बिटकॉईन’चा इतिहास

सतोशी नाकामोटो नावाच्या एका जपानी संगणकतज्ज्ञाने 2008 मध्ये हे आभासी चलन बनवले. हा माणूस कोण होता आणि सध्या तो कुठे आहे याची माहिती मिळणे अवघड आहे. ‘बिटकॉईन’चा पहिला व्यवहार हा लासजलो होनाइसिझ नावाच्या ‘प्रोगॅ्रमर’ने केला. त्याने तब्बल 10,000 ‘बिटकॉईन’ देऊन दोन ‘पापा जॉन पिझ्झा’ खरेदी केले होते. त्या वेळी ‘बिटकॉईन’ला एवढी किंमत नव्हती; पण सध्या जगात हजारो विक्रेते ‘बिटकॉईन’ स्वीकारतात व एक ‘बिटकॉईन’ लाखो रुपयांना झाला आहे.

‘बिटकॉईन’ किमतीमागचे गूढ

‘बिटकॉईन’ ज्या वेळी वापरात आला त्या वेळी त्याची किंमत अवघी तीन ते सहा रुपये होती; पण आज 10 वर्षांनी त्याची किंमत 14 लाखांवर जाऊन पुन्हा खाली आली आहे. कोणाला हे पटण्यासारखे व पचण्यासारखे अजिबात नाही; पण या वाढीमागे एक कारण आहे. सतोशी नाकामोटो यांनी ‘बिटकॉईन’ निर्माण करताना त्याची संख्या निर्धारित राहील आणि त्याला लोकांना वाटेल तेवढे निर्माण करता येऊ नये म्हणून एका तंत्रज्ञानाचा उपयोग केला. त्यामुळे निर्धारित संख्येपेक्षा जास्त ‘बिटकॉईन’ निर्माण केले जाऊ शकत नाहीत.

दोन कोटी 10 लाख एवढी ‘बिटकॉईन’ची संख्या निर्धारित आहे. त्यापेक्षा जास्त ‘बिटकॉईन’ तयार केले जाऊ शकत नाहीत. सध्या पावणेदोन कोटी एवढे ‘बिटकॉईन’ मार्केटमध्ये आहेत. राहिलेले दर वर्षी काही ठराविक ‘बिटकॉईन’ बाजारात येणार आहेत. हे ‘बिटकॉईन माइनिंग’ नावाच्या एका जटील प्रक्रियेतून येतात. मागणी आणि पुरवठा या सूत्रानुसार ‘बिटकॉईन’ची किंमत वाढणार हे निश्चित होते; पण एवढ्या कमी वेळेत त्याची किंमत वाढेल हे कोणाला वाटले नव्हते. मागच्या जानेवारी 2017 मध्ये एक ‘बिटकॉईन’ 60 ते 70 हजारांत येत असे, तो 14 लाखांवर गेला होता.

सावधानतेचा इशारा...

‘बिटकॉईन’मध्ये गुंतवणूक म्हणून यात पैसे टाकण्याचा विचार करत असाल, तर थोडे सावध राहिलेले बरे; कारण आतापर्यंत ‘बिटकॉईन’मध्ये पैसे गुंतवणारे लोक हे ‘गॅम्बलिंग, हॅकिंग’सारखा कारभार करत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे याचे भवितव्य अधांतरी आहे. ‘बिटकॉईन’ची सुरुवात 2009 मध्ये झाली. 2010 पर्यंत याची किंमत फार कमी होती; पण त्यानंतर अचानक ही वाढ झाली आहे; पण पुढे काय होईल? ही वाढ अशीच होत राहील का? की हा एक फुगा आहे? कुणालाच ठाऊक नाही, म्हणूनच तज्ज्ञ सावधानतेचा इशारा देत आहेत.