Sat, Jul 20, 2019 15:03होमपेज › Pune › वन रुपी क्‍लिनिकला रेल्वेने जागा दिलीच नाही

वन रुपी क्‍लिनिकला रेल्वेने जागा दिलीच नाही

Published On: May 14 2018 1:55AM | Last Updated: May 14 2018 1:20AMपुणे : प्रतिनिधी 

मुंबईसह देशभर यशस्वी ठरलेल्या ‘वन रुपी क्‍लिनिक’ला पुणे विभागाने मात्र धुडकावले असून, रेल्वेने त्यासाठी अद्याप जागा दिलेली नाही. मुंबईतील 20 स्थानकांवर ‘वन रुपी क्‍लिनिक’ ही संकल्पना यशस्वीरीत्या राबविण्यात येत असून, पुणे रेल्वे स्थानकावर उपक्रम सुरू करण्यात यावा याकरिता गेल्या वर्षभरात संस्थेकडून विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना दोनदा पत्र लिहिण्यात आले होतेे. मात्र, त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे प्राथमिक आरोग्य सुविधा सुरू करण्यास रेल्वेने त्यांना मोफत जागा उपलब्ध करावी, असे आदेश केंद्र सरकारने दिले होते. 

रक्तदाब, मधुमेह आदी तपासण्या मोफत, तर अन्य सल्ल्यांसाठी केवळ एक रुपया शुल्क, असा हा उपक्रम होता. मात्र, तो राबविण्यात न आल्याने प्रवाशांचे नुकसान होत असल्याचा आरोप संस्थेकडून करण्यात आला आहे. दरम्यान, सशुल्क असणारे आणि चोवीस तास सुरू राहणार्‍या इमर्जन्सी मेडिकल केअर बूथचे उद्घाटन मात्र पुणे स्थानकावर करण्यात आले आहे. 9 एप्रिल रोजी खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते त्याचे वाजतगाजत उद्घाटन करण्यात आले. 

आदित्य बिर्ला रुग्णालयाने सीएसआरअंतर्गत हे मेडिकल बूथ उभारले असून, रेल्वे प्रवाशांना प्राथमिक आरोग्य सुविधा जरी मोफत उपलब्ध करण्यात आली असली, तरीदेखील विविध तपासण्या, ऑपरेशन, औषधोपचारासाठी लागणारा खर्च रुग्णाला भरावा लागणार आहे. वन रुपी क्‍लिनिकला जागा देण्याऐवजी सशुल्क मेडिकल केअर बूथला जागा दिल्याने काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुणे स्थानकावर वन रुपी क्‍लिनिक सुरू करून गरीब रुग्णांना मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

वन रुपी क्‍लिनिक फायद्याचेच 

वन रुपी क्‍लिनिक संकल्पनेला 10 मे रोजी एक वर्ष पूर्ण झाले. या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 50 हजार रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले असून, तब्बल 12 क्‍लिनिक सुरू आहेत. मुंबईतील ठाणे स्थानकावर नुकतेच एका 22 वर्षीय महिलेची यशस्वी प्रसूती झाली. टिटवाळा ते घाटकोपरदरम्यान लोकलमधून प्रवास करताना महिलेच्या पोटात दुखू लागले. ठाण्यात महिलेची तपासणी करण्यात आली. त्यावेळी ऑनड्यूटी डॉक्टर व नर्सनी महिलेची प्रसूती केल्याची माहिती मॅजिक डीलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल घुले यांनी सांगितली. गेल्या सहा महिन्यांत 6 यशस्वी प्रसूती झाल्याचे देखील सांगण्यात आले.