Wed, Mar 27, 2019 04:17होमपेज › Pune › ..जानकर साहेब, ‘खासगी दूध संघ’ सरकारचे ऐकेचनात !

..जानकर साहेब, ‘खासगी दूध संघ’ सरकारचे ऐकेचनात !

Published On: Apr 07 2018 1:38AM | Last Updated: Apr 07 2018 1:38AMपुणे : दिगंबर दराडे

राज्य सरकारने दुधाचा हमीभाव 27 रुपये प्रतिलिटर करून देखील खासगी दूध संघांनी दुधाचे दर पुन्हा 19 ते 20 रुपयांवर नेऊन ठेवले आहेत. राज्य सरकारने दिलेल्या आदेशाचे देखील या दूध संघाकडून पालन होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. सरकारकडून देखील याची कुठल्याही प्रकारे दखल घेतली जात नाही. त्यामुळे दूध उत्पादक पुन्हा कात्रीत सापडला आहे. दर न देणार्‍या संघांवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्याकडून दूध उत्पादक करीत आहेत. 

1 जून 2017 रोजी शेतकर्‍यांनी राज्यव्यापी संप करीत, दुधाची विक्री न करता दूध रस्त्यावर ओतून निषेध केला होता. कुठल्याही प्रकारे दुधासह भाजीपाला शहरात जाऊ दिला नाही. त्यामुळे सरकारने या आंदोलनाची दखल घेत, दुधाला 24 रुपयांवरून 27 रुपये हमीभाव केला; तसेच जो हा दर देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाईचा इशाराही दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी दिला होता. मात्र, दाखविण्यापुरताच काही काळ हा दर राहिला. 3.5 फॅट व 8.5 स्निग्धता यास 27 रुपये भाव, तसेच 3.5 फॅटच्या पुढे प्रतिपॉइंटला 30 पैसे असा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानंतर दुधाला मिळत असलेल्या चांगल्या दरामुळे शेतकर्‍यांना सुगीचे दिवस आले होते; परंतु काही महिन्यांतच पुन्हा दुधाचे दर ‘जैसे थे’ होण्यास सुरुवात झाली आहे. सरकारच्या हमीभावाच्या निर्णयाला न जुमानता खासगी आणि सहकारी दूध संघांनीही दुधाचे दर 27 रुपयांहून खाली थेट 19 ते 20 रुपयांवर आणले. त्यामुळे जे दूध संघ 27 रुपये प्रतिलिटर दुधाला भाव देणार नाही, अशा संघावर कारवाई अशी अपेक्षा दूधउत्पादक करीत आहेत. 

दुधाचे दर वाढविण्याची चर्चा सुरू झाली, तसे चार्‍याचे दर वाढले. शेतकर्‍यांना दुधापोटी चार पैसे जास्त मिळणार आहेत. कारण त्याला अशा दिलाशाची गरजच आहे. पाण्याची टंचाई जाणवत आहे. सुसंघटितपणे होणार्‍या दुग्ध संकलनाचे आणि वितरणाचे प्रमाण दररोज एक कोटी लिटर एवढे आहे. त्यातले 50 लाख लिटर दूध सहकारी संस्थांतर्फे संकलित केले जाते, तर उर्वरित 50 लाख लिटर दूध खासगी संस्था संकलित करून वितरण करत असतात. सध्या कडब्याची एक पेंढी किमान 12 ते 15 रुपयांना विकली जात आहे. एखादी दुभती गाय सांभाळायची असेल तर दिवसाकाठी तिला 60 ते 70 रुपयांचा नुसता कडबाच खाऊ घालावा लागतो. त्याशिवाय पशुखाद्य, पेंड, भुस्सा यांचा खर्च वेगळाच. त्यामुळे शेतकरीसुध्दा दुभती जनावरे सांभाळण्याचा खर्चापायी मेटाकुटीस आलेले आहेत. 

महाराष्ट्रामध्ये दुधाचा खरेदी आणि विक्रीचा दर यामध्ये फार मोठी तफावत आहे. दुधाचे दर वाढले तरी शेतकर्‍यांना मिळणारा दर कमीच असतो. या दोन्हीतला फरक हा दूध संघाचा खर्च असतो, हे कबूल; पण तो लिटरमागे किती यावा याचे काही मानक ठरलेले नाही. दूध संघाचा खर्च म्हणून संघ जास्तच पैसे घेतो. तेव्हा दूध संघांनी दरवाढ करताना शेतकर्‍यांनासुध्दा न्याय मिळेल, असा प्रयत्न केला पाहिजे; अन्यथा दरवाढ होईल पण शेतकरी आहे तिथेच राहील. 

 

Tags : pune, pune news, milk rates, Strict action, against Sangha,