Fri, Mar 22, 2019 07:56होमपेज › Pune › घराणेशाही नव्हे; क्षमतेवर नेतृत्व हवे

घराणेशाही नव्हे; क्षमतेवर नेतृत्व हवे

Published On: Jul 09 2018 1:04AM | Last Updated: Jul 09 2018 12:47AMपुणे : प्रतिनिधी  

घराणेशाहीवर नव्हे तर क्षमतेवर नेतृत्व हवे, असे आर्य चाणक्य यांनी 2300 वर्षांपूर्वी  सांगून ठेवले आहे, असा दाखला देत  राजपुत्राला ‘राजा’ करू नये, असा टोला भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता मारला. पुण्यात बाराव्या रामभाऊ म्हाळगी स्मृतिव्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ‘आर्य चाणक्य-जीवन और कार्य-आज के संदर्भ में’ या विषयावर अमित शहा यांनी संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामभाऊ म्हाळगीचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्‍ता टिळक, खासदार विनय सहस्रबुध्दे आदी उपस्थित होते. 

चाणक्य नीतीचे बाळकडू मिळालेल्या शहा यांनी आपल्या पाऊणतासाच्या मनोगताला किस्से, अनुभव आणि विविध घटनांचा दाखला देत आर्य चाणक्यांचा जीवनपट उभा केला. त्यांंची विदेश, शिक्षण, रक्षा, अर्थ आणि कुटनीती उलगडताना याच मार्गावर मोदी आणि भाजपा सरकारची वाटचाल सुरू असल्याचे अमित शहा यांनी सूचित केले. ज्या दिवशी सावरकरांनी जहाजातून समुद्रात उडी मारली, त्याच दिवशी चाणक्य नीतीचे निरुपम करण्यास उभा असल्याचे स्मरण करून देत त्यांनी उपस्थितांची दाद मिळवली. ते म्हणाले, राजाला एकच मुलगा असेल व त्याला राज्यकारभाराची समज नसेल तर त्याला राजा न बनवण्याची कल्पना तेवीसशे वर्षांपूर्वी चाणक्यांनी मांडली होती.

यावेळी सभागृहात एकच हशा पिकला. कोणतेही नेतृत्व घराणेशाहीवरून ठरत नाही तर त्या नेतृत्वाच्या क्षमतेवरून ठरते. क्षमता असलेले नेतृत्व कधीही लपून राहत नसल्याचे त्यांनी सांगितले. व्यापारात देशहिताला प्राधान्य असावे, असे चाणक्यांनी सांगितले.  हजारो असत्यांना तोडून सत्य तयार करणे चाणक्यांचे मूळ सूत्र आहे. त्यांनी दिलेली शिकवण आजच्या काळातही लागू होते. साम -दाम- दंड -भेद हे कोणत्याही व्यक्‍ती हितासाठी वापरू नयेत. ते देशाच्या हितासाठी वापरले तर चालेल, असा सल्‍लाही त्यांनी यावेळी दिला. कोणतेही राष्ट्र महान आहे, राजा नाही. राष्ट्र मजबूत असेल तरच राष्ट्र पुढे जाऊ शकते. ते मजबूत करण्याची शिकवण खर्‍या अर्थाने चाणक्य यांनी दिली. 

आजचे दाखले देत शहा म्हणाले...

1) फुलाला वेदनाही होणार नाहीत, सुगंध आणि सौंदर्याला धक्का पोहोचणार नाही, अशा पद्धतीने भुंगा फुलातील पराग वेचतो त्याप्रमाणे कर वसूल करा, असे चाणक्य सांगतात.
2) विकास शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे, असे चाणक्यांची अर्थनीती सांगते. मला वाटते, मोदींचा ‘सबका साथ सबका विकास’ हे धोरण याचेच द्योतक आहे.
3) राजाकडे साम, दाम, दंड, भेद या सर्व अस्त्रांचा वापर केला पाहिजे, हे सांगताना चाणक्याने एक मेख मारली आहे ती म्हणजे या अस्त्रांचा प्रजेवर कधीच वापर होता कामा नये.
4) ज्या देशाची बांधणी केवळ संस्कृतीवर आधारित आहे, असा एकमेव हिंदुस्थान आहे, याची सर्वप्रथम व्याख्या आर्य चाणक्य यांनी केली व त्याच पद्धतीने बांधणी करून देश एकसंघ ठेवला.
5) महाभारतापासून आत्तापर्यंत एकाही सम्राटाने दुसर्‍याची संस्कृती तोडण्यासाठी प्रयत्न केला नाही. कारण इथे भूसंस्कृती वसली आहे, ही संस्कृतीच आपली ताकद आहे.
6) आपला उद्धार व शत्रूराष्ट्राचा क्षय हे चाणक्यांच्या विदेशनीतीचे वैशिष्ट्य होते. शत्रूराष्ट्राचा नाश करण्यासाठीच सध्याचे धोरण आहे.

शहा, बाजीराव आणि पुणेरी  पगडी!

राष्ट्रवादी वर्धापनदिनाच्या जाहीर सभेत शरद पवार यांनी पारंपरिक पुणेरी पगडीला छेद देत महात्मा फुलेची पगडी घालायचे, त्या पध्दतीची पगडी घालून इथून पुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात हीच पगडी घालण्याचा सल्ला दिला होता. या पार्श्‍वभूमीवर  अमित शहा यांचा पुणेरी पगडी घालून केलेला सत्कार चर्चेत आला. ‘ पुणेरी पगडी घालून सत्कार’ असा निवेदकाने आवर्जून केलेला उच्चार, यावेळी प्रेक्षगृहातून झालेली घोषणाबाजी  आणि शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीराव यांचे नाव घेऊन केलेली सुरुवात यामुळे ‘किस्सा पगडी का’ पुन्हा चर्चेत आला.