Fri, Jul 19, 2019 20:22होमपेज › Pune › शिवसेना गटनेते कलाटे यांच्या समर्थकांचे ’असहकार’

शिवसेना गटनेते कलाटे यांच्या समर्थकांचे ’असहकार’

Published On: Jun 18 2018 1:11AM | Last Updated: Jun 17 2018 10:51PMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर 

पिंपरी-  चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्यासह त्यांच्या समर्थक पाच नगरसेवकांनी पक्षाशी सध्या असहकार धोरण स्वीकारले आहे. खासदार श्रीरंग बारणे समर्थक योगेश बाबर यांची शहर प्रमुखपदी झालेली नियुक्ती,  त्यापाठोपाठ गटनेत्यांना विचारात न घेता स्मार्ट सिटी कंपनीवर भाजपने नियुक्त केलेल्या प्रमोद कुटे यांची पिंपरी   विधानसभा प्रमुखपदी झालेली नियुक्ती हे कळीचे मुद्दे ठरले आहेत. त्यामुळे लोकसभेच्या तयारीसाठी लोणावळ्यात आयोजित सेनेच्या कार्यशाळेकडेही कलाटे समर्थकांनी पाठ फिरवली.  भविष्यात ते काय भूमिका घेतात याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे 

महापालिकेच्या सन 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातलेले लक्ष ,राष्ट्रवादीतील दिगगजांचा भाजपात झालेला प्रवेश याचा परिणाम म्हणून पालिकेत सत्तांतर झाले. 128 पैकी 77 जागा जिंकून भाजपने सत्ता संपादन केली. राष्ट्रवादीच्या पारड्यात 36 जागा पडल्या. युतीच्या आशेवर काहीसे निर्धास्त राहिलेल्या शिवसेनेला युती मोडल्याचा फटका बसला. सेेनेला अवघ्या 9 जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत सेनेचे चिंचवड मतदार संघातून अश्विनी चिंचवडे, निलेश बारणे ,सचिन भोसले, राहुल कलाटे, रेखा दर्शीले ,अश्विनी वाघमारे  हे सहा तर पिंपरी मतदार संघातून अमित गावडे, प्रमोद कुटे, मीनल यादव हे तीन, असे एकूण 9 नगरसेवक निवडून आले. यातील स्वतः कलाटे, दर्शीले वाघमारे, गावडे, यादव असे कलाटे गटाचे पाच नगरसेवक आहेत. 

महापालिका   निवडणुकीनंतर सेनेच्या गटनेतेपदी राहुल कलाटे यांची नियुक्ती झाली. मात्र स्थायी समिती  सदस्य,स्मार्ट सिटी कंपनी, ,वृक्ष प्राधिकरण सदस्य नियुक्त्यांवरून  पक्षात वादळ उठले .भाजपने शिवसेनेच्या गटनेत्यांना न विचारता स्मार्ट सिटी वर प्रमोद कुटे यांची तर वृक्ष प्राधिकरण समितीवर सचिन भोसले यांची नियुक्ती केली.  त्यास कलाटे यांनी आक्षेप घेतला. भोसले यांनी वाद टाळण्यासाठी वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला. पण कुटे यांनी राजीनाम्यास नकार दिला. त्यामुळे कुटे यांच्या नियुक्ती विरोधात कलाटे यांनी न्यायालयात धाव घेतली .

हे सारे वाद रंगले असतानाच शिवसेनेत शहरप्रमुख बदलाचे वारे वाहू लागले. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील समर्थक सुलभा उबाळे व खासदार श्रीरंग बारणे समर्थक योगेश बाबर यांच्यात स्पर्धा होती .मात्र बारणे समर्थक बाबर यांची नियुक्ती झाल्याने कलाटे डिस्टर्ब झाले. पक्षाची  शहर कार्यकारिणी नेमताना आपल्या समर्थकांची नावे देण्याबाबतही त्यांनी अनुत्साह दाखवला. त्यातून ते सावरत असतानाच दरम्यानच्या काळात भाजपच्या संपर्कात असलेल्या प्रमोद कुटे यांची पिंपरी विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती झाल्याने कलाटे  चांगलेच अस्वस्थ आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने नुकतीच लोणावळा येथे कार्यशाळा झाली.  कार्यशाळेस शिवसेना नेते संजय राऊत ,नितीन बानगुडे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर नेत्यांनी मार्गदर्शन केले .मात्र या कार्यशाळेकडे कलाटे समर्थक नगरसेवकांनी पाठ फिरवली . त्यामुळे कलाटे समर्थकांच्या या अघोषित असहकार आंदोलनाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे .भविष्यात कला टे समर्थक काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

लोकसभेसाठी सेनेला त्रासदायक 

लोकसभा निवडणूक तोंडावर असताना शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी असहकार पुकारल्याने लोकसभा शिवसेनेला त्रासदायक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे