Thu, Jul 18, 2019 08:04होमपेज › Pune › नोन यू सीड इंडिया, चंद्रशेष ट्रेडर्सला दणका

नोन यू सीड इंडिया, चंद्रशेष ट्रेडर्सला दणका

Published On: Jun 01 2018 2:11AM | Last Updated: Jun 01 2018 1:14AMपुणे : प्रतिनिधी 

ब्रोकलीची शेतात लागवड केल्यानंतर त्याला कंद न आल्यामुळे शेतकर्‍याचे नुकसान झाल्याप्रकरणी त्याला नोन यू सीड इंडिया प्रायव्हेट लिमीटेड आणि चंद्रशेष ट्रेडर्स या कंपन्यांनी दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश ग्राहकमंचाने अध्यक्ष एम. के. वालचाळे, सदस्य शुभांगी दुनाखे, एस. के. पाचरणे यांच्या मंचाने दिला आहे. 

माणिक अनंत थोरात ( रा. उरुळी कांचन, खेडेकर मळा, ता. हवेली) यांनी नोन यू सीड इंडिया प्रायव्हेट लिमीटेड, मुख्य व्यवस्थापक, (कार्यालय, सर्वे नंबर 87, पिपळे - जगताप रोड, कोरेगाव भीमा, ता. शिरुर), सायन्टीफीक सिडलीग (इ) प्रा. लि. चे व्यवस्थापक (कार्यालय उरुळीकांचन, ता. हवेली), मे. चंद्रशेष ट्रेडर्स, संचालक (कार्यालय, शेषराव वेअर हौसिंग, पुणे - सासवड पुलाजवळ, गौरी हॉटेलजवळ, फुरसुंगी) यांच्याविरुद्ध दावा दाखल केला होता.

तक्रारदारांची उरुळी कांचन येथे शेतजमीन आहे. विरुद्ध पक्षाने दिलेल्या जाहिरातीवरून तक्रारदार थोरात यांना ‘ब्रोकली सुरती’ या पिकाची माहिती मिळाली. त्यांनी त्याची लागवड करण्याचे ठरविले. थोरात यांच्या मुलाने एक फेब्रुवारी 2017 रोजी नोन यु सीड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी उत्पादित केलेले ब्रोकली सुरतीचे बियाणे विरुद्ध चंद्रशेष ट्रेडर्सकडून खरेदी केले. बियाणे खरेदी केल्यानंतर सायन्टीफीक सिडलीगकडून तक्रारदाराने त्यांची रोपे तयार करून घेतली. त्या रोपांची लागवड तक्रारदाराने मार्च 2017 मध्ये त्यांच्या शेतात केली.

मात्र लागवड केलेल्या ब्रोकली सुरती या पिकापैकी 90 टक्के पिकाला कंद तयार झाले नाही. त्यांनी सायन्टीफीक सिडलीग व चंद्रशेष ट्रेडर्स यांना विचारणा केली. मात्र त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी 19 जून 2017 रोजी गट विकास अधिकार्‍यांकडे तक्रार केली. 30 जुलै 2017 रोजी तक्रार निवारण समिती तथा उप विभागीय कृषी अधिकारी यांनी पिकाची पाहणी तक्रारदारांच्या शेताला भेट देऊन केली. त्याबद्दलचा अहवाल 27 जुलै 2017 रोजी दिला. ब्रोकली सुरती पिकास कंद तयार न झाल्यामुळे तक्रारदाला बरेच नुकसान सहन करावे लागले. त्यांनी विरुद्धपक्षाला नोटीस देऊन नुकसान भरपाईची मागणी केली. मात्र ती पूर्ण झाल्यामुळे तक्रारदाराने ग्राहक मंचाकडे दावा दाखल केला. यामध्ये दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर तसेच मंचासमोर आलेल्या पुराव्यानंतर मंचाने नुकसान भरपाईचे आदेश दिले आहेत. मानसिक त्रासाबद्दल 10 हजार रुपये आणि तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रुपये द्यावेत, असा आदेश मंचाने दिला.