Thu, Apr 25, 2019 07:45होमपेज › Pune › सुटे पैसे नाहीत; मग चॉकलेट घ्या

सुटे पैसे नाहीत; मग चॉकलेट घ्या

Published On: Dec 07 2017 1:24AM | Last Updated: Dec 06 2017 11:17PM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

उद्योगनगरीत सध्या सुट्या पैशांची मोठी चणचण भासत असून, यावर उपाय म्हणून व्यावसायिकांनी पुन्हा एकदा दोन किंवा पाच रुपयांच्या बदल्यात चॉकलेट देणे सुरू ठेवले आहे. यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. 

केवळ सुटेे पैसे नसल्याने एखाद्या दुकानात कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी गेल्यावर; तसेच रिक्षातून प्रवास करताना रिक्षाचालक व ग्राहक यांच्यात हमखास वाद होताना दिसत आहे. व्यावसायिकांद्वारे व हॉटेलमध्येही ग्राहकांना सुटे नसल्यास सर्रास चॉकलेट दिली जात आहे. काही ग्राहकांनी याला विरोध दर्शवला असून, काही ग्राहक मात्र आपल्या आवडीची चॉकलेटच मागून घेताना दिसत आहे. दुसरीकडे ग्राहक बँकेतून सरळ पाचशे व शंभरच्या नोटा घेऊन हातात टेकवत असल्याने आम्ही सुटे आणायचे कोठून, असा सवाल विक्रेत्यांनी केला आहे.

‘सुटे आहेत का, तरच वस्तू विकत घ्या’  

टपरीधारक, छोटे व्यावसायिक व ग्राहकांचीही डोकेदुखी वाढली आहे. यामुळे अनेकदा उधारीत माल घेणार्‍यांच्या संख्येत वाढ होत असून, चिल्लर विकत घेण्यासाठी अधिक रक्कम मोजावी लागत असल्याची खंत व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. पानाच्या टपर्‍या, चहा व विविध खाद्यपदार्थांच्या टपर्‍या, भाजी विक्रेते आदी ठिकाणी नाण्यांची  गरज भासते; मात्र आता ग्राहकांना वस्तू विकत घेण्याआधीच सुटे आहेत का, असा प्रश्‍न विचारला जात असून, सुटे असतील तरच विकत घ्या नाहीतर राहू द्या, असे बोल ऐकावयास मिळत आहेत. सुट्या पैशांच्या टंचाईमुळे काही व्यावसायिकांनी पूर्वीप्रमाणेच सुट्या पैशांच्या बदल्यात चॉकलेट देण्याचा प्रकार सुरू केला आहे. काहींनी सर्रास आठ रुपयांच्या वस्तू दहा रुपयांस विकण्यास सुरुवात केली आहे. प्रसंगी भिकार्‍यांकडून सुटे पैसे घेऊन अडचण दूर केली जात असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे.