Wed, Nov 21, 2018 11:49होमपेज › Pune › बांधकाम कामगारांच्या जिवाशी होतोय खेळ

बांधकाम कामगारांच्या जिवाशी होतोय खेळ

Published On: Jun 23 2018 1:22AM | Last Updated: Jun 22 2018 11:46PMपिंपरी : प्रदीप लोखंडे

डुडुळगाव येथे नुकतेच कामावर असताना तीन कामगारांचा मृत्यू झाला. शहरात बिल्डरांकडून कोणतीही सुरक्षासाधने दिली जात नाहीत. त्यामुळे कामगारांना आपला जीव गमवावा लागत आहे. बिल्डरांकडून बांधकाम कामगारांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. त्यामुळे या बिल्डरांवर कारवाई करावी, अशी मागणी शहरातील बांधकाम कामगार संघटना करीत आहेत. 

दिघी, मोशी, चर्‍होली परिसरात अनेक गृहप्रकल्पांची बांधकामे सुरू आहेत. या ठिकाणच्या नागरीकरणाचा वेग वाढला आहे; मात्र गृहप्रकल्पांचे काम सुरू असताना साईटवर काम करणार्‍या कामगारांच्या जिवाच्या रक्षणासाठी ठेकेदाराकडून कोणतीही सुरक्षा साधने पुरविली जात नाहीत. त्यामुळे  कामगारांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे  दिसत आहे. साईटवर कामगारांना संरक्षणासाठी हेल्मेट, बूट, जॅकेट, हातमोजे, संरक्षक जाळ्या व दोरखंड अशी साधने पुरविली जात नाहीत. केवळ पोटापाण्यासाठी हे मजूर जीव धोक्यात घालून काम करीत असल्याचे वास्तव आहे.नुकतेच डुडुळगाव येथे तीन कामगारांचा मृत्यू झाला. या अगोदर हिंजवडी व इतर परिसरातही कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे. शहरातील एखाद्या साईटवर अशी दुर्दैवी घटना घडल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाईचा फार्स केला जातो. याशिवाय बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंद नसल्याने मंडळाकडून मिळणार्‍या लाभापासूनही कामगार कुटुंबीय वंचित राहात आहेत.