Tue, Jul 23, 2019 10:58होमपेज › Pune › रिक्‍तपदांची भरती नाही; त्यात अधिकार्‍यांची बदली

रिक्‍तपदांची भरती नाही; त्यात अधिकार्‍यांची बदली

Published On: Jun 27 2018 1:56AM | Last Updated: Jun 26 2018 11:48PMपिंपरी : प्रदीप लोखंडे

मोहननगर येथील कामगार रुग्णालयातील रिक्‍तपदांची भरती केली जात नाही. त्यामध्येच तेथील अधिकार्‍यांची बदली केली जात आहे. सध्या वर्ग 1 च्या नेत्ररोग तज्ज्ञांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर अद्याप दुसर्‍या कोणाचीही नेमणूक करण्यात आलेली नाही; तसेच रुग्णालयात असणारी रिक्‍त पदे अद्यापही भरण्यात आलेले नाही. 

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये औद्योगिकरणामुळे कामगारांची संख्या वाढत आहे. राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत 5 लाख कामगार याचा लाभ घेत आहेत; तसेच विमा कायद्याअंतर्गत त्यांच्या कुटुंबीयांनाही याचा लाभ घेण्याची सुविधा आहे. ही संख्या अधिक असताना रूग्णालयातील कर्मचार्‍यांची संख्या फारच कमी आहे. कंपनीत काम करताना किंवा इतर ठिकाणी  कामगारांना अनेक अपघात होत असतात. साथीच्या आजाराबरोबर व हृदयाशी संबंधित अशा अनेक खर्चीक आजारांनाही त्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशावेळी त्यांना तात्काळ सुविधा मिळणे गरजेचे आहे. रूग्णालयात तज्ञ डॉक्टरांची वाणवा असल्याने रूग्णांना मात्र दुसर्‍या  रूग्णालयात उपचार घेण्याची वेळ येत आहे. तज्ञांच्या अभावी अतिविशिष्ठ आजारांवर उपचार होत नाही. 

 पुर्वी हे रूग्णालय 50 बेडचे होते. वाढत्या कामगारांची संख्या लक्षात घेता सध्या हे रूग्णालय 100 बेडचे आहे. यानुसार आवश्यक असणारी संख्याही वाढविणे गरजेचे होते. अद्यापही ती वाढवली नाही. ऐक्स-रे काढण्यासाठीचे मशीन्स उपलब्ध आहे. मात्र त्यासाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञच नाहीत. एप्रिल 2014 च्या वेळी असणार्‍या रेडिओलॉजिस्टनी  राजीनामा दिला होता. तेव्हापासुन अद्यापही हे पद रिक्‍तच आहे. कंत्राटी कामगारांची मर्यादा 55 आहे. त्यामध्ये 28 भरलेले असून 27 पदे रिक्‍तच आहेत. सिस्टरच्या 11 पैकी केवळ एकच पद भरले असून 10 पदे रिक्‍तच आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ज्ञांची 30 पदांपैकी 14 पदे रिक्‍तच आहेत.