Thu, Apr 25, 2019 18:23होमपेज › Pune › ‘डिंभे’ची सुरक्षा रामभरोसे

‘डिंभे’ची सुरक्षा रामभरोसे

Published On: Jul 23 2018 1:10AM | Last Updated: Jul 23 2018 1:06AMभीमाशंकर : अशोक शेंगाळे

कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठे धरण असलेल्या हुतात्मा बाबू गेनू जलाशयाचे (डिंभे धरण) वीजबिल 1 कोटी 3 लाख 19 हजार 306 रुपये थकीत झाले आहे. त्यामुळे या धरणावरील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. सध्या डिंभे धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होत असून रात्रीच्या वेळी धरणाच्या संपूर्ण भिंतीवर व आजूबाजूच्या परिसरात अंधार असतो. त्यामुळे धरण परिक्षेत्रामध्ये होणार्‍या हालचाली लक्षात येणे अवघड झाले आहे. परिणामी धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

हुतात्मा बाबू गेनू जलाशय (डिंभे धरण) परिसर व मुख्य भिंतीच्या सुरक्षेसाठी कर्मचारी कार्यरत आहे. संबंधीत कर्मचारी प्रशिक्षित नाहीत व त्यांना स्वत:च्या संरक्षणासाठी कोणत्याही प्रकारची हत्यारे नाहीत. या धरणावर सुरक्षेसाठी कोणत्याही पोलिसाची नेमणूक नाही. धरण व परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा नाही. यातच वीज पुरवठा खंडित केल्याने डिंभे धरण व परिसरामध्ये अंधार आहे. सन 2011 ला या धरणात बॉम्ब व बंदुकीच्या गोळ्या आढळल्या होत्या. परंतु त्या निकामी निघाल्याने कोणतीही वित्त व जीवितहानी झाली नाही. या घटनेचा कोणताही बोध धरण विभागातील संबंधित अधिकारी घेतल्याचे दिसून येत नसल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.       

डिंभे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास दरवाजे उघडण्यासाठी वीज पुरवठ्याची आवश्यकता आहे. परंतु धरणावर जनरेटर असल्याने त्याच्या सहाय्याने दरवाजे उघडता येतील, असा संबंधित अधिकार्‍यांचा अंदाज आहे. परंतु ऐनवेळी जनरेटरमध्ये काही बिघाड झाला तर होणार्‍या नुकसानीस कोण जबाबदार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. याबाबत महावितरणच्या अधिकार्‍यांनी वारंवार तोंडी व लेखी पत्रव्यवहार धरण विभागाला करूनसुध्दा वीजबिल भरण्याबाबत कोणतीही कारवाई झाली नसल्याचे दिसत आहे.

गेटवर सुरक्षारक्षक नाहीत 

हुतात्मा बाबू गेनू जलाशयाचे (डिंभे धरण) बांधकाम सन 1978 मध्ये सुरू करण्यात आले. घोड नदीवर सुमारे 852 मीटर लांब, 72 मीटर उंच व 13.50 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणारे हे धरण सन 2000 मध्ये बांधुन पूर्ण झाले. धरणाच्या भिंतीलगत जलविद्युत प्रकल्पही राबविला गेला आहे. त्या गेटवर कोणताही कर्मचारी नसल्याने प्रकल्पापर्यंत सहजपणे जाता येते. तर अनेक वेळा मद्यपींनी या ठिकाणी गोंधळही घातलेला आहे.