Wed, Jul 17, 2019 18:59होमपेज › Pune › शहरात उमललेले, जिल्ह्यात कोमेजले!

शहरात उमललेले, जिल्ह्यात कोमेजले!

Published On: Jul 20 2018 1:12AM | Last Updated: Jul 20 2018 12:07AMपुणे  : दिगंबर दराडे

भाजपने कित्येक वर्षांनंतर शहरात आपली ओळख निर्माण केली आहे खरी; मात्र जिल्ह्यात भाजपला फारसे यश मिळताना दिसत नाही. नुकत्याच झालेल्या भोर नगरपालिकेच्या निवडणुकीत हे पुन्हा अधोरेखित झाले. पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक असो, जिल्हा बँकेची निवडणूक असो की कात्रज दूध संघाची निवडणूक... या निवडणुका भाजपने प्रतिष्ठेच्या बनविल्या नसल्याचे वास्तव आहे. शहरात कमळ फुलले आहे; मात्र जिल्ह्यात कमळ फुलण्याकरिता नेते का कमी पडतात, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

भोर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मंत्री प्रचाराला आले. तरीदेखील एकही जागा जिंकता आली नाही. 17 जागांवर काँग्रेसने आपले वर्चस्व सिद्ध करून एकहाती सत्‍ता मिळवली आहे. भाजपला अद्याप ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर हवे तेवढे यश संपादन करता आले नाही.वर्षांनुवर्षे काँग्रेस, राष्ट्रवादीत राजकीय भवितव्य शोधणारी मंडळी मागच्या अडीच ते तीन वर्षांत भाजपमध्ये चांगलीच स्थिरावली. साधनशुचितेच्या गोष्टी करणार्‍या भाजपवाल्यांनीही या सार्‍यांना ‘अ‍ॅडजस्ट’ करून घेतले आहे. याचा पक्षाला मोठा लाभ होत असला, तरी भविष्यात हे ‘खुले आयात धोरण’ मारक ठरणार आहे. सत्ताकांक्षी मंडळींचा नेहमी सत्तेकडे कल असतो. सत्तेशिवाय ही माणसे जगू शकत नाहीत. अशा बेभरवशी व्यक्तींना पावन करून घेण्याचे फायदेदेखील तत्कालिकच असतात. काही ठिकाणी ग्रामीण भागातील भाजपचा विजय म्हणजे पक्षाचे घट्ट रुजणे नसून केवळ हवाच आहे, जी कधीही बदलू शकते  हे पक्षधुरिणांच्या एव्हाना लक्षात यायला लागले असेल.

भाजप आत्तापासूनच 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. विधानसभा निवडणुकाही त्यासोबत घेण्याचा मानस असल्याची चर्चा आहे. ‘जय’ आणि ‘पराजय’ कधीही कुणाला धक्का देऊ शकतात,  हे लक्षात ठेवायला हवे.  नगरपालिका, ग्रामपंचायतीच्या निवडणुका, त्यातील प्रश्न वेगळे असतात. प्रामुख्याने स्थानिक मुद्यांवर या निवडणुका लढविल्या जातात. गावकी-भावकीचे राजकारणही याकरिता महत्त्वाचे ठरते.  स्वाभाविकच व्यक्तीसोबत मनी, मसल पॉवर निर्णायक ठरते. 

थेट सरपंचपदाच्या निवडीमुळे भाजपच्या आव्हानात अधिक जान भरली गेली; मात्र नगरपालिका निवडणुकीत पुणे जिल्ह्यात भाजपला फारशे यश संपादन करता आलेले नाही.  सत्तेसाठी भाजपमध्ये येणारा कार्यकर्ता-नेता सामावून घेण्याची क्षमता, इच्छा आणि ‘धाडस’ सध्या फक्त भाजपमध्ये  दिसते. भाजपवाढीचे हे एक मोठे कारण आहे. म्हणूनच भाजपची दिल्लीपासूनची गटबाजी आता गल्लीबोळापर्यंत पोहोचली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातही फारशी वेगळी स्थिती नाही.  पदांसाठी कार्यकर्त्यांची चढाओढ सुरू असते. कोण कोणाला कसे बाद करतो यासाठी सतत डावपेच आखले जातात. जिल्ह्यात राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाजवळ कार्यकर्त्यांची फळी आहे. जिल्हास्तरीय पदाधिकारीही आहेत. ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेत किंवा सहकार राजकारणात भाजपला अजूनही पाय रोवता आले नाहीत. जिल्हा को-ऑप. बँक आदी सहकारी संस्थांच्या सत्तेचा स्पर्शही भाजपला झालेला नाही. 

भोरच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या. ज्या जिल्ह्यात शहरी भागाने भाजपला साथ दिली, त्याच जिल्ह्यात ग्रामीण भागाने पक्षाला सातत्याने नाकारल्याचे दिसते. विशेष म्हणजे भाजपचे या जिल्ह्यात अनिल शिरोळे, संजय काकडे, अमर साबळे, प्रकाश जावडेकर असे खासदार आहेत. जावडेकर केंद्रात कॅबिनेट मंत्रीही आहेत. शहरातील सर्व आमदार त्यांचेच आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट पुण्याचेच आहेत. मात्र भाजप या लोकप्रतिनिधींच्या बळाची व्यूहात्मक रचना पक्ष विस्तारासाठी करू शकलेला नाही. जिल्ह्यावर मांड टाकू शकणारे नेतृत्व उभे करण्याची प्रक्रियादेखील दिसत नाही.