Sun, Apr 21, 2019 14:11होमपेज › Pune › ट्रॅक्टर ट्रॉलींचे पासिंगच नाही!

ट्रॅक्टर ट्रॉलींचे पासिंगच नाही!

Published On: Dec 04 2017 1:36AM | Last Updated: Dec 04 2017 12:22AM

बुकमार्क करा

पुणे : नवनाथ शिंदे

शेतीकामासाठी वापरण्यात येणार्‍या ट्रॅक्टर ट्रॉलींचे पासिंग शासनाने 1997 पासून बंद केले आहे. परिणामी साखर कारखान्यांच्या गळीत हंगामात ऊस वाहतूक करणार्‍या अनफिट ट्रॉलींमुळे अपघातांची मालिका सुरू झाली आहे. शासनाने ट्रॅक्टर-ट्रॉलींचे वर्गीकरण ‘ट्रान्सपोर्ट व्हेईकल’ संवर्गातून ‘नॉनट्रान्सपोर्ट व्हेईकल’मध्ये केल्यामुळेच, हे अपघात वाढल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. दोन दिवसांपूर्वी इंदापूर तालुक्यातील मदनवाडीत ट्रॉली अपघातामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे; त्यामुळे अनफिट ट्रॉली आणखी किती जणांचा जीव घेणार असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. ट्रान्सपोर्ट वाहतूक संवर्गातील सर्व वाहनांची दरवर्षी आरटीओकडून फिटनेस तपासणी करणे बंधनकारक आहे; मात्र शासन निर्णयामुळे राज्यातील ट्रॉलींचे पासिंग 1997 पासून बंद केले आहे.

परिणामी 20 वर्षांपासून ऊस गळीत हंगामात रात्रीच्या वेळी ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॉलींच्या पाठीमागे रिफ्लेक्टर नसणे, ट्रॉली क्रमांक अस्पष्ट असणे, टेललॅम्प आणि हेडलॅम्प नसणे, पिवळ्या रंगाने वाहन न रंगविल्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. आरटीओच्या नोंदीनुसार पुणे शहर आणि ग्रामीण विभागात 12 हजार 793 ट्रॉली आहेत; तर सोलापूरमध्ये 14 हजार 986, पिंपरी-चिंचवडमध्ये 4 हजार 109, बारामतीत सर्वाधिक 16 हजार 302; तर अकूलजमध्ये 7 हजार 371 ट्रॉली आहेत. 

प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत एकूण 55 हजार 561 ट्रॉलींची नोंद आहे. दरवर्षी होणारे ट्रॉलींचे पासिंग बंद झाल्याने, राज्यातील 218 पैकी 190 कारखान्यांची ऊस वाहतूक करणार्‍या हजारो अनफिट ट्रॉली रस्त्यावर बिनधास्तपणे धावत आहेत. मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 56 नुसार, केंद्रीय मोटार वाहन नियम 62 अन्वये वाहन मालकांना ही वाहने योग्यता प्रमाणपत्र चाचणीसाठी आरटीओ कार्यालयात आणणे बंधनकारक होते. 

दरम्यान शेती कामासाठी वापरण्यात येणार्‍या ट्रेलर्सची केंद्रीय मोटार वाहन नियम 2 (जीआर) नुसार ‘नॉनट्रान्सपोर्ट’ संवर्गात नोंदणी करण्याचा निर्णय शासनाने 1 जानेवारी 1997 मध्ये घेतला. नियमानुसार ट्रेलरची नोंदणी केल्याच्या पहिल्या दिवसानंतर 15 वर्षांपर्यत वैध आहे. त्यानंतर दर पाच वर्षांनी नोंदणीचे नूतनीकरण करणे महत्त्वाचे आहे; परंतु पासिंग बंद झाल्यामुळे वर्षानुवर्षे शेतकी कामासाठी वापरल्या जाणार्‍या ट्रॉलींच्या फिटनेसकडेे दुर्लक्ष केले जात आहे; त्यामुळे शासनाचा ट्रॉलीबद्दल पासिंगचा नियम इतर वाहनचालकांच्या प्रवासाला धोकादायक ठरत आहे.

अनफिट ट्रालींमुळेच अपघातांची मालिका

राज्यातील साखर कारखान्यांची संख्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक आहे; त्यामुळे रात्रीच्या वेळी विविध रस्त्यांवरून फिटनेस नसलेल्या असंख्य ट्रालींद्वारे ऊसवाहतूक केली जाते. रिफ्लेक्टर नसणे, क्षमतेपेक्षा जास्त ऊस ट्रॉलीमध्ये भरणे, अनुभवी चालक नसणे यामुळे विविध महामार्गांवर अपघातांची मालिका कायम आहे. साखर कारखाना आणि आरटीओच्या माध्यमातून वाहतूकदारांना सूचना देऊन नियमांचे पालन केल्यास अपघात कमी होण्यास मदत होणार आहे.

रिफ्लेक्टर बसवा; अपघात टाळा

रात्रीच्या वेळी ऊस वाहतूक करताना ट्रॉलीच्या पाठीमागे आणि उसाची उंची असेपर्यंत लाल रंगाचे कागदी रिफ्लेक्टर प्रत्येक खेपेला बसविण्याचे आवाहन दै. ‘पुढारी’च्या वतीने करण्यात येत आहे. त्यामुळे अपघातांची मालिका थांबविण्यास मदत होणार आहे.