पुणे : प्रतिनिधी
शहरातील विविध रस्त्यांवर नो पार्किंग असतानाही वाहने लावली जात आहेत, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. तसेच रस्त्यालगतच अवैध बांधकामामुळे वाहनांच्या दूरवर रांगा लागत आहेत. त्यामुळे प्रत्येक वाहतूक विभागांतर्गत संबंधित वाहतूक पोलिस निरीक्षकांनी खबरदारी घेऊन, कारवाई करावी, अशी सूचना वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी दिल्या आहेत. शनिवारी वाहतूक उपायुक्त कार्यालयात विविध विषयावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये साहाय्यक वाहतूक उपायुक्त आणि पोलिस निरीक्षकांची उपस्थिती होती.
शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रत्येक विभागातील पोलिस निरीक्षकांसह कर्मचार्यांनी प्राधान्य दिले पाहिजे. विशेषतः वर्दळीच्या ठिकाणी अतिरिक्त कर्मचार्यांची नियुक्ती करून, वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून सुटका करणे गरजेचे आहे. सुटीच्या दिवशी खरेदीच्या निमित्ताने बाहेर पडलेल्या नागरिकांमुळे ठिकठिकाणी रस्त्यावर वाहनांची संख्या वाढते. वाहन पार्किंग करण्यासाठी जागा न मिळाल्यामुळे, अनेकांकडून रस्त्याच्या कडेलाच वाहनांचे पार्किंग केले जाते. त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिक भर पडते. अशा नो पार्किंगच्या ठिकाणी पार्किंग करणार्या नागरिकांवर कारवाई करून वाहतूक कोंडी सोडविण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना त्यांनी केल्या.
अनेक भागात अवैध बांधकामामुळे वाहनांच्या दूरवर रांगा लागत आहेत. अशा अवैध बांधकामांची यादी संबंधित वाहतूक निरीक्षकांनी तातडीने मुख्यालयात पाठवावी, अशी सूचनाही सातपुते यांनी या बैठकीत केली. ही यादी महानगरपालिकडे पाठवून कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे. बैठकीत नो पार्किंग आणि रस्त्यावरील अवैद्य बांधकामे नवनियुक्त वाहतूक उपायुक्तांच्या रडारवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.शहरातील बेशिस्त वाहनचालक विशेषतः दुचाकी आणि ट्रॅव्हल्स चालकांची दादागिरी मोडीत काढण्यासाठी हडपसर, संगमवाडी, वारजे, स्वारगेट परिसरातील ड्राईव्ह घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सिग्नलच्या कामासाठी पाठपुरावा करणार
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्तीचे नियंत्रण करण्यासाठी एकच अभियंता आहे. त्यामुळे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यास मनुष्यबळाअभावी दुरुस्तीसाठी वेळ वाया घालवावा लागत आहे. तर मॅन्युअली वाहतुकीचे नियोजन त्रासदायक ठरत आहे. त्यापार्श्वभूमीवर महापालिकेकडे सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी जादा कर्मचार्यांची नियुक्ती करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.