होमपेज › Pune › कर्जमाफीत १ ऑगस्ट २०१७ नंतर व्याज आकारणी नाही

कर्जमाफीत २०१७ नंतर व्याज आकारणी नाही

Published On: Mar 19 2018 1:48AM | Last Updated: Mar 19 2018 1:48AMपुणे : प्रतिनिधी

राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीत शेतकर्‍यांना पूर्वघोषित केल्यानुसार 31 जुलै 2017 पर्यंतचे व्याज माफ होते. त्यानंतर नव्याने शासनाने 1 ऑगस्ट 2017 ते योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी व्याज आकारणी करू नये, असे आदेश 13 मार्चला दिले आहेत. त्यामुळे लाभार्थी शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला असून नवीन पीककर्ज मिळण्यास त्याचा फायदा होणार आहे.

याबाबतच्या आदेशात असे म्हटले आहे की, 1 एप्रिल 2009 ते 31 मार्च 2016 पर्यंत उचल केलेल्या पीक, मध्यम मुदत कर्जाची 30 जून 2016 रोजी थकीत झालेल्या रकमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून 31 जुलै 2017 पर्यंत मुद्दल व व्याजासह परतफेड न झालेली थकबाकीची रक्कम रुपये दीड लाखापर्यंत कर्जमाफीस पात्र धरण्यात आलेली आहे. तसेच पीक व मध्यम मुदत कर्जाच्या मुद्दल व व्याजासह रुपये दीड लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकर्‍यांसाठी एकवेळ समझोता योजना (ओटीएस) म्हणून 30 जून 2016 रोजी थकीत झालेल्या रकमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून 31 जुलै 2017 पर्यंत मुद्दल  व व्याजासह परतफेड न झालेली थकबाकीची रुपये दीड लाखापर्यंत रक्कम योजनेत पात्र धरण्यात आलेली आहे.

बँका किंवा सोसायट्यांकडून 1 ऑगस्ट 2017 ते योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत योजनेच्या निकषानुसार पात्र थकीत रकमेवर व्याजाची आकारणी झाल्यास अशा व्याज आकारणीमळे योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे कर्जखाते कर्जमाफी मिळूनही निरंक होऊ शकत नाही. साहजिकच नवीन कर्ज मिळणे त्यास अवघड होते. त्यादृष्टीने या आदेशाला महत्त्व आहे.