Wed, Jun 26, 2019 17:57होमपेज › Pune › बालगंधर्व रंगमंदिरात हौशी कलावंतांना ‘नो’ एन्ट्री!

बालगंधर्व रंगमंदिरात हौशी कलावंतांना ‘नो’ एन्ट्री!

Published On: Jun 15 2018 1:06AM | Last Updated: Jun 15 2018 1:06AMपुणे : केतन पळसकर

नाट्य चळवळीला प्रोत्साहन मिळावे म्हणून साकारण्यात आलेल्या बालगंधर्व रंगमंदिरात हौशी नाट्यकर्मींनाच हुसकावून लावण्यात येत असल्याची परिस्थिती आहे. येथे होणारी व्यावसायिक नाटके, लावण्या, राजकीय कार्यक्रम आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या गर्दीत, हौशी रंगकर्मींना रंगदेवतेची पूजा करण्याची संधीच मिळत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे, हौशी आणि प्रायोगिक नाटकांची चळवळ फक्त सुदर्शन रंगमंच, ज्योत्स्ना भोळे रंगमंचापुरतीच जिवंत राहिली.

बालगंधर्व रंगमंदिराच्या रंगमंचावर कला सादर करण्याचे प्रत्येक कलावंताचे स्वप्न असते. मात्र, पूरक धोरणांचा अभाव आणि चुकिचे नियम, यामुळे हौशी, प्रायोगिक नाट्यकलावंतांना हक्काच्या बालगंधर्व रंगमंदिराऐवजी सुदर्शन रंगमंच, ज्योत्स्ना भोळे सभागृह अशा तोकड्या जागेत, आपली नाट्यकला सादर करावी लागत आहे. हा रंगमंच आज हौशी किंवा प्रायोगिक नाटकांसाठी ओळखला न जाता, फक्त व्यावसायिक नाटके, लावणी महोत्सवासाठीच ओळखला जात आहे. नाट्यगृहाची उपलब्धता, आर्थिक गणिते जुळत नसल्यामुळे हौशी आणि प्रायोगिक नाट्य संस्था बालगंधर्व रंगमंदिरात आपली कला सादर करण्याचे टाळतात. त्याचा परिणाम नाट्यप्रयोगावर, नाट्यकलेवर आणि विशेषत: उदयोन्मुख नाट्य कलावंतावर होतो.  

का परवडत नाही?

हौशी रंगकर्मींना नाटक उभे करण्यासाठी नेपथ्य, पार्श्‍वसंगीत, प्रकाशयोजना, रंगभूषा आणि इतर, असा सुमारे 30 ते 40 हजार रुपयांचा खर्च येतो. सादरीकरणासाठी येणारा खर्च वेगळाच. एखाद्या प्रायोजकाची मदत घेऊन, हा खर्च भागवावा लागतो. त्यात नाट्यगृहाचे भाडे सुमारे 4 ते 6 हजार रुपये इतके आहे. हौशी कलाकार म्हणून तिकीट देऊन प्रेक्षक येत नाहीत.

..तर वाढेल नाट्यचळवळ

कलाकार घडविण्यासाठी पाया असलेल्या या चळवळीला बळ देण्यासाठी राज्य नाट्य स्पर्धेसारखे सरकारी उपक्रम होत आहेत. याचसारखे स्थानिक प्रशासनाकडून प्रयत्न होण्याची गरज आहे. हौशी कलाकारांसाठी नाट्यगृह राखीव ठेवल्यास, त्यांच्यासाठी निधीची तरतूद केल्यास, तसेच खासगी उद्योगांनी सामाजिक निधीच्या माध्यमातून या चळवळीला आर्थिक पाठबळ दिल्यास हौशी नाट्यकर्मींना बळ मिळू शकते.