Thu, Jul 18, 2019 02:08होमपेज › Pune › खा. बारणे यांनी भरीव विकासकाम केले नाही.

खा. बारणे यांनी भरीव विकासकाम केले नाही.

Published On: Jul 11 2018 1:38AM | Last Updated: Jul 10 2018 11:55PMपिंपरी : प्रतिनिधी 

मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मतदारसंघात कुठलेही भरीव विकासकाम केले नाही. त्यामुळे आगामी मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच खासदार होईल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मोरेश्‍वर भोंडवे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना मंगळवारी केला. 

मोरेश्‍वर भोंडवे म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमध्ये पासपोर्ट कार्यालय आणण्याच्या पलिकडे खासदार बारणे यांनी कुठलेही भरीव विकास काम केले नाही. रेल्वेचे चौपदरीकरण रखडले असून दापोडी ते लोणावळा रेल्वे स्टेशनची दुरवस्था झाली आहे. या भागातील रेल्वे स्टेशनचे अत्याधुनीकरण व सेवा देण्याचे कुठलेही काम त्यांच्याकडून झालेले नाही. सध्या सातत्याने होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे गोरगरीबांना व सर्वसामान्यांना रेल्वेने प्रवास करणे सोयीचे ठरत आहे. अशा वेळी लोणावळा ते कर्जत लोकलच्या फेर्‍या वाढविणे गरजेचे होते. केंद्र शासनाशी निगडीत रेल्वेप्रमाणे कुठलीही मोठी कामे तर सोडाच साधे समाजमंदिरही खासदार फंडातून त्यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये उभारले नाही, अशी टीकाही त्यांनी खा. बारणे यांच्यावर केली. 

केंद्र शासनाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत मोठे उद्योग प्रकल्प आणता आले असते. पिंपरी-चिंचवडमध्ये उद्योग वाढीसाठी खा. बारणे यांच्याकडून कुठलेही ठोस काम झालेले दिसले नाही. उलट या शहरातून मोठमोठे उद्योग गुजरातसह अन्य राज्यात गेले असल्याची टीका करून भोंडवे म्हणाले की, खासदार बारणे यांनी फक्त लग्न, मृत व दशक्रिया विधी आदी कार्यक्रमांना उपस्थिती लावण्याचे काम केले आहे. आता जनता हुशार झाली आहे. जनता विकासकामांचा हिशोब मागते व कामे पाहूनच लोकप्रतिनिधींना निवडून देत आहे. खासदार बारणे यांना त्यांच्या पक्षात एकतर किंमत राहिली नसावी अथवा त्यांच्या पक्षात त्यांना रस नसावा. त्यामुळेच त्यांनी क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर टपाल तिकिटाच्या प्रकाशन कार्यकमात भाजपच्या नेत्या व लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन व केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहिर यांना निमंत्रित केले होते.

आमच्याच चुकीमुळे बारणे खासदार झाले

मागील लोकसभा निवडणुकीत आमच्या चुकीमुळे सेनेचे श्रीरंग बारणे खासदार झाले. आमच्याच लोकांनी त्यांना आतून मदत केली. राष्ट्रवादीमध्ये आता एकजुटीने काम होणार आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचाच व पिंपरी-चिंचवडमधीलच खासदार होईल, असा दावा नगरसेवक मोरेश्‍वर भोंडवे यांनी केला. परंतु कोण होणार हे सांगता येणार नाही, असेही ते म्हणाले.