Mon, Apr 22, 2019 21:46होमपेज › Pune › मराठी विद्यापीठाबाबत ठोस निर्णय घेत नाही : डॉ. श्रीपाल सबनीस

मराठी विद्यापीठाबाबत ठोस निर्णय घेत नाही : डॉ. श्रीपाल सबनीस

Published On: Dec 15 2017 2:46AM | Last Updated: Dec 15 2017 12:10AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

पंतप्रधानांना अनेक कामे असतात; याची मला जाणीव आहे. मात्र, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सर्व निकष पूर्ण होऊन देखील संबंधित फाईल धुळखात पडल्या आहेत. यासंदर्भात साहित्य परिषदेसह इतर अनेक संस्थाकडून आजवर लाखो पत्रे शासनाला पाठविण्यात आले आहेत. मात्र, याची दखल शासनाकडून घेतली जात नाही. तसेच राज्यामध्ये मराठी विद्यापीठ करण्यासंदर्भात शासन कुठलाही ठोस निर्णय घेत नाही, हे देखील शासनाचे दुर्देव आहे, असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हाते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मसापचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, कार्यवाह प्रकाश पायगुडे, डॉ. शिवाजी कदम, अंजली देशमुख, सुनिताराजे पवार उपस्थित होत्या. सबनीस पुढे म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्यातील अनेक साहित्यिक, संस्था यांनी राज्य शासन तसेच केंद्र शासनाला अनेक वेळा पत्र लिहीली आहेत. त्यासाठी लागणारे सर्व निकष देखील पूर्ण झाले आहेत. मात्र, सरकारकडून दर्जा देण्याविषयी केवळ राजकीय आश्वासने दिली जात आहेत.

हा मराठी भाषेवरील अन्याय आहे. केवळ राजकीय आश्वासन न देता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा आणि प्रत्यक्ष कृती करुन दाखवावी. बेळगावात आज मराठी माणसाला जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यासंदर्भात देखील साहित्य संमेलानाचे अध्यक्ष म्हणून देशमुख यांना भूमिका घ्यावी लागणार आहे. देशमुख म्हणाले, मानवी, नैतिक मुल्ये ही लेखकाची कवचकुंडले आहेत. 125 कोटी लोकसंख्या असलेल्या भारत देशामध्ये आजही कोट्यावधी लोक उपाशीपोटी राहत आहेत. साहित्याचा मोठा इतिहास असणार्‍या बडोदा येथील साहित्य संमेलनाचे मी अध्यक्षपद भूषविणार आहेत. यापुर्वी न. चि. केळकर यांनी बडोद्यातील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले.