Thu, Apr 25, 2019 07:26होमपेज › Pune › पानसरे यांचे मीठच आळणी...

पानसरे यांचे मीठच आळणी...

Published On: Jul 05 2018 1:40AM | Last Updated: Jul 05 2018 12:41AMपिंपरी : जयंत जाधव

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांना विधान परिषदेच्या निवडणुकीची उमेदवारी न मिळाल्याने आमदारकीची त्यांची संधी पुन्हा एकदा निसटली आहे. त्यामुळे त्यांनी कोणत्याही पक्षाला मदत करो त्यांचे मीठच आळणी असल्याची खंत त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केली; तर पानसरे यांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा असलेले महामंडळ अथवा आगामी काळात 2020 मध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागांवर संधी मिळण्याची शक्यता भाजपाच्या वर्तुळात वर्तविली 
जात आहे.

भाजपाच्या केंद्रीय समितीकडून बुधवारी दुपारी विधानपरिषदेच्या पाच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत आझम पानसरे यांचे नाव असेल, अशी अपेक्षा  शहरातील भाजपा व राजकीय वर्तुळात होती. त्यांच्यासाठी भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, भाजपाचे सहयोगी अपक्ष आमदार महेश लांडगे व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी जोरदार प्रयत्न केले, यासंदर्भात दोन्हीही आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोनवेळा भेट घेऊन गळ घातली होती. पालकमंत्री बापट यांनी पानसरे यांची पिंपरी-चिंचवडबरोबर पुणे शहरातही मदत झाल्याचे मुख्यमंत्र्यांकडे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांनीही त्यांना सहमती दर्शवली होती; मात्र केंद्रीय संचालन समितीच्या बैठकीत एकमत न झाल्याने पानसरे यांचे नाव मागे पडले. त्यामुळे स्थानिक व प्रदेश नेत्यांचे प्रयत्न अपुरे पडल्याचे स्पष्ट झाले.

राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या जागा 2020 मध्ये रिक्त होतील तेव्हा त्यांची त्या ठिकाणी वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पानसरे पुढील आश्‍वासनावर आगामी 2019 मधील  लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचे काम कितपत जोर लावून करतील याबाबत साशंकताच आहे. त्यामुळे पानसरे यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेल्या एखाद्या महामंडळावर नियुक्ती करून त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाणार असल्याचे पक्ष वर्तुळात बोलले जात असले तरी पानसरे यांना महामंडळात रस नसल्याने ते विधानपरिषदेसाठीच आग्रही असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे.

आ. जगताप व आ. लांडगे यांच्यानंतर पानसरे भाजपात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा एकेकाळचा बालेकिल्ला पिंपरी-चिंचवड महापालिकेतील यशाचा आकडा गाठून भाजपा सत्तेत आली; परंतु सत्तेचे कुठलेच पद पानसरे यांना अद्याप मिळालेले नाही. राष्ट्रवादीनेही आजपर्यंत त्यांचा वापर करून त्यांना डावलले होतेे. त्यामुळेच पानसरे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या त्रासाला कंटाळून भाजपात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष प्रवेशावेळी शब्द देऊन  भाजपकडूनही पानसरे यांना डावलले गेल्याने पानसरे समर्थकांमध्येही बुधवरी प्रचंड नाराजी दिसून येत होती; परंतु त्यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. राज्यात भाजपकडे अल्पसंख्यक नेतृत्व असलेला चेहरा नाही. अशा काळात पानसरे यांच्या माध्यमातून भाजपला अल्पसंख्यकांना संधी देण्याची मोठी संधी होती; परंतु भाजपने ती डावलली आहे. त्यामुळे पानसरे समर्थक भाजप नेतृत्वावर नाराज आहेत. तरीही भाजपा सत्तेवर असल्याने पानसरे यांच्या पुनर्वसनाची शक्यता अधिक आहे.

राष्ट्रवादीतील विलास लांडे समर्थकही नाराज   

राष्ट्रवादी काँग्रेसमधील विधानपरिषदेवर माजी आमदार विलास लांडे यांच्याही नावाची जोरदार चर्चा होती. त्यासाठी महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील व अजित पवार यांच्यासमोर तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यासमोर लांडे यांना विधानपरिषदेवर संधी देण्याची जोरदार मागणी केली होती. यामध्ये साने यांना आपलाही विधानसभेचा मार्ग मोकळा हवा होता, परंतु लांडे यांचीहीं संधी आज हुकल्याने शहरातील विलास लांडे समर्थकही नाराज दिसून येत होते.