Fri, Apr 26, 2019 03:22होमपेज › Pune › स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी ‘नो’ अ‍ॅपचे अनावरण

स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी ‘नो’ अ‍ॅपचे अनावरण

Published On: Feb 15 2018 1:57AM | Last Updated: Feb 14 2018 11:37PMपुणे : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी प्रोग्राम फॉर प्रायमरी प्रिवेंशन ऑफ़ सेक्सुअल व्हायोलन्स कार्यक्रमाचा भाग असलेल्या नो (छज) या अ‍ॅपचे उद्घाटन केले. या अ‍ॅपचा उद्देश भारतातील स्त्रिया व मुलांवरील लैंगिक हिंसा रोखणे हा असून केईएम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे; शारीते येथील बर्लिन इन्स्टिट्यूट ऑफ सेक्सोलोजी; आणि भारतातील तज्ज्ञांचे सल्लागार मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जाणारा कार्यक्रम आहे.

या प्रसंगी बोलताना विजया रहाटकर म्हणाल्या, लैंगिक हिंसा ही आपल्या जगातील एक कठोर वस्तुस्थिती आहे. फक्त स्त्रिया किंवा एका विशिष्ट लिंगाच्या व्यक्तींविरुद्ध घडणारी तुरळक घटना नाही, तर ते एक सामाजिक वास्तव आहे. लैंगिक हिंसेमुळे निरनिराळे मानसिक आणि मनोकायिक आजार उद्भवतात. म्हणून सर्व समाजाला ग्रासून टाकणारी ही एक सार्वजनिक आरोग्यासाठीची समस्या आहे. या पार्श्वभूमीवर समाजातील लैंगिक हिंसा टाळण्यासाठी समाजाचाच धाक उपयोगात आणण्यासाठी निर्माण केले गेलेले ‘नो’ हे अ‍ॅप आहे. ‘नो’ अ‍ॅप सारखे महत्वाचे उपक्रम हा लैंगिक हिंसेचा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक संस्था आणि व्यक्तींचा सहभाग घडवून आणत आहेत, यागोष्टीचा मला आनंद आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, ह्या प्रकल्पावर काम करणारी टीम ही ‘प्रतिसाद’ आणि अहोरात्र काम करणारे कॉल सेंटर यांच्या माध्यमातून पोलिसांबरोबर काम करीत आहे. त्यामुळे लैंगिक हिंसेच्या भीतीने त्रस्त झालेल्या लोकांचे संकटकाळी मदत मागण्यासाठीचे कॉल हे कार्यक्षमपणे आणि परिणामकारकरीत्या हाताळता येतील. म्हणून ‘नो’ अ‍ॅप ही खरोखर गरजेची गोष्ट आहे.

डॉ. क्लाउस बैअर हे बर्लिन येथील इन्स्टिट्यूट ऑफ सेक्सोलोजी व सेक्शुअल मेडिसिन येथे संचालक प्राध्यापक आहेत. लैंगिक हिंसा घडूच नये, तिला प्राथमिक प्रतिबंध करता यावा, म्हणून वैद्यकशास्त्र आणि तंत्रज्ञान यांच्या एकत्रित मार्गाने काही पद्धतींचा विकास करणे, हे पीपीपीएसव्ही चे ध्येय आहे, असे ते म्हणाले.

‘नो’ ऍप हे अतिप्रसंगाच्या घटनांचे प्रत्यक्ष ठिकाण शोधून, नोंदवून ते प्रसृत करण्याच्या प्रक्रियेवर आणि पद्धतींवर आधारित आहे. सध्याच्या मोबाईल तंत्रज्ञानामुळे हे सगळे सोपे झाले आहे. विनयभंगाचा धोका किंवा प्रत्यक्ष अतिप्रसंगाच्या घटनेमध्ये ’नो’ अ‍ॅप वापरणार्‍यांना ‘संकट आले आहे’, किंवा ‘धोका वाटतोय’, असा संदेश मोबाईलवरच्या एका आयकॉन किंवा बटणाला स्पर्श करून क्षणार्धात पाठवता येतो. अशा इतर ’नो’ अ‍ॅप धारण करणार्‍या जवळपासच्या परिसरातील मोबाईलधारकांना हा संदेश तत्क्षणी मिळेल, शिवाय अशा घटनेचे ठिकाणही कुठे आहे ते समजेल. या कार्यपद्धतीमुळे समाजाचा वचक वाढून अशा घटनांवर नियंत्रण येईल.

‘प्रतिसाद’ या ऍप च्या माध्यमातून ‘छज’ ऍप हे महाराष्ट्र पोलिसांबरोबर सहकार्य करीत आहे. अशा रीतीने प्रत्येक संकटाचा इशारा देणारा संदेश - घटनेच्या ठावठिकाण्यासाहित पोलिसांना तत्क्षणीच मिळेल. यामुळे पोलिसांना गस्तीवरच्या अधिकार्‍यांना नेमक्या ठिकाणी लगेचच पाठवणे शक्य होईल. याशिवाय एक अहोरात्र काम करणारे कॉल सेंटर संकटाचा इशारा देणारे कॉल तत्पर कार्यक्षमतेने हाताळत असेल, असे यावेळी सांगण्यात आले.