Thu, Jan 24, 2019 05:40होमपेज › Pune › पुणे : मोबाईल रेंजने केला घोटाळा

पुणे : मोबाईल रेंजने केला घोटाळा

Published On: Aug 24 2018 10:08AM | Last Updated: Aug 24 2018 10:07AMखडकवासला: प्रतिनिधी 

पानशेत धरण भागात पर्यटनासाठी गेलेले हडपसर येथील मगर व सातव कुटुंबातील लहान मुलांसह सर्व सात जण गुरुवारी दुपारी सुखरूपपणे सापडले. त्यामुळे नातेवाईकांसह पोलिसांचा जीव भांड्यात पडला.बुधवारी (दि. 22) सकाळी अकरा वाजल्यापासून पानशेत धरण खोर्‍यात पर्यटनासाठी गेलेल्या  दोन्ही कुटुंबाचा मोबाईल ला रेंज नसल्याने संपर्क होत नव्हता. त्यामुळे पोलिसांसह नातेवाईकांना मोठी धावपळ करावी लागली.

पानशेत धरण भागातील अतिदुर्गम शिरकोली येथील गुंजन फार्म हाऊसमध्ये हे सर्व जण होते. तेथे मोबाईलला रेंज नसल्याने त्यांचा संपर्क होत नव्हता. बुधवारी सकाळी अकरा वाजता खडकवासला धरणाजवळील गोर्‍हे बुद्रुक येथील आकॅरियस हॉटेलमधून ते बाहेर पडले. तेव्हापासून त्यांचा संपर्क होत नव्हता. हवेली पोलिस याबाबत तपास करत होते. डस्टर आणि पांढर्‍या कलरची स्विफ्ट अशा दोन कारमधून ते फिरण्यासाठी पानशेत धरण भागात गेले होते. या घटनेने पुण्यात मोठी खळबळ उडाली होती.

हडपसर परिसरात राहणाणारे मगर आणि सातव कुटुंबांतील सात जण एकाएकी संपर्कात नसल्याने या कुटुंबीयांचे नातेवाईक काळजीत होते. सिद्धार्थ ऊर्फ हरीश सदाशिव मगर (38  वर्षे), त्यांची पत्नी स्नेहल ऊर्फ ईश्वरी मगर, जुळ्या मुली- आरंभी आणि सायली (5 वर्षे), त्यांचे मित्र जगन्नाथ हरी सातव, पत्नी आणि त्यांचा पाच वर्षांचा मुलगा, असे सात जण बेपत्ता होते.  बेपत्ता कुटुंबांच्या शोधासाठी हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांच्यासह पोलिस पथक; तसेच मगर यांचे नातेवाईक नांदेड सिटीचे संचालक अ‍ॅड. नरसिंह लगड आदींनी खडकवासला, सिंहगड, पानशेतचा परिसर पिंजून काढला. वेल्हा पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक सुवर्णा हुलावन तसेच गणेश लडकत यांनी पानशेतच्या स्थानिक कार्यकर्त्यांसह धरण भागातील फार्म हाऊस, हॉटेलची माहिती घेतली.

गुरूवारी सकाळी पुन्हा पोलिसांनी शोध घेतला असता दोन्ही कुटुंबीय सुखरूप असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही कुटुंबीय अतिदुर्गम शिरकोली येथे होते. मोबाईल रेंज नसल्याने नातेवाईकांशी या कुटुंबीयांचा मोबाईलवर संपर्क झाला नव्हता.