Tue, May 21, 2019 01:04होमपेज › Pune › चांगले अधिकारी  नकोसे झालेत

चांगले अधिकारी  नकोसे झालेत

Published On: Feb 20 2018 1:55AM | Last Updated: Feb 20 2018 12:24AMपुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तुकाराम मुंढे आणि महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांची नुकतीच तडकाफडकी बदली झाली. या अधिकार्‍यांची ओळख शिस्तप्रिय अशीच बनली होती. नियमांवर बोट ठेवून काही कडक निर्णय या अधिकार्‍यांनी घेतले होते. त्यामुळे मुंढे यांच्या रूपाने पीएमपीत, तर देशभ्रतार यांच्या रूपाने महापालिकेच्या कारभारात शिस्त येण्यास सुरुवात झाली होती. मात्र, त्यांची अचानक बदली झाल्यामुळे पुन्हा एकदा वार्‍यावरचा कारभार सुरू होणार आहे. त्यापेक्षाही या अधिकार्‍यांच्या तडकफडकी झालेल्या बदल्यांमुळे पुन्हा एकदा चांगले अधिकारी का नको आहेत आणि ते नक्की कोणासाठी अडचणीचे ठरत आहेत, असे विविध प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.

आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या हा काही नवीन विषय नाही. अनेक अधिकार्‍यांच्या बदल्या या-ना त्या कारणांनी वादग्रस्त ठरत असतात. मात्र, गेल्या काही वर्षात पुण्यात आपल्या कामाने वेगळी ओळख निर्माण करणार्‍या आणि कामात शिस्त आणणार्‍या अधिकार्‍यांच्या वर्ष-दोन वर्षाच्या आतच तडकाफडकी बदल्यांचा धडाका राज्य शासनाने लावला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातही अशाच पध्दतीने कारभार सुरू होता. आत्ता सत्ताधारी भाजपनेही तीच री ओढली आहे. त्याचा फटका मात्र सर्वसामान्यांना आणि त्यांना मिळणार्‍या सोयी-सुविधांना बसत आहे. एकीकडे काही अधिकारी तीनपेक्षा अधिक वर्षांचा कालावधी पूर्ण होऊन, बड्या राजकीय नेत्यांच्या कृपादृष्टीने एकाच जागेवर आहेत, तर दुसरीकडे मुंढे आणि देशभ्रतार या अधिकार्‍यांचा कालावधी पूर्ण होण्याआधीच त्यांच्या बदल्या होत आहेत, असे विरोधाभासाचे चित्रही यानिमित्ताने पाहायला मिळत आहे.

राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना, पिंपरी चिंचवडचे तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांनी अनधिकृत बांधकामांवर केलेल्या कारवाईमुळे त्यांची कालावधी पूर्ण होण्याआधीच बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्याकडे मुद्रांक शुल्क आणि पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी होती. त्यांच्या अल्प कालावधीत त्यांनी पीएमपीला रुळावर आणण्याचे काम केले; मात्र, त्यांची लगेचच बदली झाली. त्यानंतर पुण्यात अशाच पध्दतीने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनाही केवळ वर्षभरातच बदलीला सामोरे जावे लागले होते. सत्ताधारी भाजप आमदारांच्या मागणीवरून बकोरिया यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती; मात्र, या बदलीला विरोध झाल्यानंतर ती रद्द करण्याची नामुष्की सत्ताधारी भाजपवर आली होती. त्यानंतर बकोरिया यांनी कामाचा तडाखा सुरूच ठेवला. एका बड्या मोबाईल कंपनीच्या गैरकारभाराला त्यांनी लगाम घातला होता. त्यामुळे पुन्हा वरिष्ठ पातळीवर सूत्रे फिरली आणि बकोरिया यांची पुन्हा वर्षभराच्या आतच बदली झाली. त्यानंतर आता मुंढे आणि देशभ्रतार यांचा नंबर लागला आहे.

महापालिकेच्या कारभारात चुकीच्या पध्दतीने सुरू असलेल्या कामांच्या प्रथेला लगाम लावण्याचे काम देशभ्रतार यांनी दोन वर्षात केले. समान पाणीपुरवठा योजनेचे एस्टिमेट अवाच्या सवा फुगविण्याचा प्रताप सल्लागार कंपनी आणि काही राजकीय मंडळींनी मिळून केला होता. त्याला कात्री लावण्याचे धाडस देशभ्रतार यांनी केले. त्यासाठी त्यांनी वरिष्ठांचा दबाव झुगारला. या कामाची पावती अखेर त्यांना मिळाली आणि त्यांची बदली झाली. असाच प्रकार मुंढे यांच्याबाबत घडला. पीएमपीला रुळावर आणण्यासाठी त्यांनी काही कठोर निर्णय घेतले, त्यात अनेक कर्मचार्‍यांना घराचा रस्ताही दाखविला. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या मंडळींना मुंढे नकोसे झाले, त्यांनी मुंढे हटावची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आणि त्यांना यशही आले. 

या सगळ्या अधिकार्‍यांच्या नावावर नजर मारल्यास त्यांची कार्यक्षम अधिकारी अशीच ओळख असल्याचे दिसून येते. हाच कार्यक्षमपणा त्यांच्या अंगलट येत असल्याचे दिसून येते. हे अधिकारी ज्या ठिकाणी गेले, तेथील चुकीच्या कामांना आळा बसला. त्यामुळे राजकारणी, ठेकेदार आणि संबंधित संस्थांचे अधिकारी-कर्मचारी यांच्या संगममताने केलेले गैरकारभार बंद पडू लागले. त्यातूनच अशा अधिकार्‍यांना विरोध होऊ लागला. हितसंबंधांना अडचण आल्याने या अशा अधिकार्‍यांच्या बदल्या होत आहेत.

कर्मचार्‍यांच्या निलंबनामुळे मुंढे हे रोषाला कारणीभूत ठरले असले, तरी खरे कारण वेगळे आहे. पीएमपीत खासगी बस ठेकेदारांची सुरू असलेली मनमानी, चुकीच्या पध्दतीने झालेली कर्मचार्‍यांची भरती आणि प्रस्तावित जवळपास 1 हजार बसेसच्या खरेदी प्रक्रियेत मुंढे हे अडचणीचे ठरू लागल्यानेच त्यांना नाशिकला पाठविण्यात आले. दुर्दैव म्हणजे सगळेच राजकीय पक्ष याबाबतीत एका माळेचे मणी दिसत आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्यांनाच आवाज उठवावा लागणार आहे.    

- पांडुरंग सांडभोर