Sun, Jul 21, 2019 09:55होमपेज › Pune › महापालिकेला मिळेना सक्षम अधिकारी

महापालिकेला मिळेना सक्षम अधिकारी

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 10 2018 12:15AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सक्षम अधिकार्‍यास ‘ऑफिसर ऑफ द मंथ’ हा पुरस्कार देण्याचा ठराव 21 मार्चला स्थायी समितीने घेतला आहे. त्यावर दीड महिन्यांचा कालावधी लोटला तरी, पालिका प्रशासनाला सक्षम अधिकारी सापडलेला नाही. त्यामुळे पालिका समितीचे ठराव किती गांभीर्याने घेत आहे, हे स्पष्ट होत आहे. पालिकेत चांगले काम करणार्‍या अधिकार्‍यांना कौतुकाची थाप मिळावी म्हणून तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांनी ‘ऑफिसर ऑफ द वीक’  या पुरस्काराची पद्धत सुरू केली होती. या पुरस्कारामुळे अधिकार्‍यांचा उत्साह वाढला होता. त्यामुळे सर्वच अधिकारी अधिक उत्साहात काम करीत असल्याचे चित्र होते. मात्र, परदेशी यांच्या अचानक बदलीनंतर पुरस्कार वाटपाची पद्धतही गुंडाळून ठेवण्यात आली. 

पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस जाऊन भाजपची सत्ता आली. पहिल्याच सभेत स्थायी समितीने पालिकेच्या चांगल्या अधिकार्‍यांना ‘ऑफिसर ऑफ द मंथ किंवा वीक’ हा पुरस्कार देण्याचा ठराव मंजूर केला. मात्र, त्यास वर्षे उलटूनही पालिका प्रशासनाने त्याची अंमलबजावणी केली नाही. आता नव्याने आलेल्या समिती अध्यक्षा ममता गायकवाड यांनी ‘ऑफिसर ऑफ द मंथ’ पुरस्कार देण्याचा ठराव 21 मार्चच्या सभेत केला. संबंधित अधिकार्‍यांस एलईडी रोषणाईने सजविलेला फिरता चषक प्रदान करावा. तो चषक संबंधित अधिकार्‍यांच्या छायाचित्रासहपालिका भवनाच्या दर्शनी भागात ठेवण्याचा निर्णय समितीने घेतला. मात्र, या निर्णयास दीड महिन्याचा कालावधी लोटला तरी, अद्याप एकाही अधिकार्‍याला या पुरस्काराने गौरविण्यात आलेले नाही. पालिकेत भ्रष्टाचार बोकाळला असून, आयुक्त श्रावण हर्डीकर यांना एकही सक्षम अधिकारी दिसत नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. का पालिका प्रशासन स्थायी समितीच्या निर्णयांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत आहे, असा प्रश्‍न समितीचे सदस्य व्यक्त करीत आहेत.