Fri, Apr 26, 2019 20:16होमपेज › Pune › सातारा रस्ता बसथांब्यांविना

सातारा रस्ता बसथांब्यांविना

Published On: Feb 10 2018 1:54AM | Last Updated: Feb 10 2018 12:54AMपुणे :  प्रसाद जगताप

पुण्यातील बहुतांश नागरिक आपली दैनंदिन कामे करण्यासाठी पीएमपी बसचा वापर करतात. शाळकरी मुले, नोकरदार, कामगारांकडून वाहतूकीसाठी बसचाच वापर केला जातो. त्यामुळे रोजच बससाठी उभे राहणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यातच सातारा रस्त्यावरील बसस्थांब्यांची कामे सुरू असल्यामुळे काही बसथांबे सोडले, तर संपूर्ण सातारा रस्ता बसथांब्यांविनाच झाला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. 

सातारा रस्त्यावर कात्रज चौक, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय चौक, भारती विद्यापीठ, बालाजीनगर, के. के. मार्केट चौक, अरण्येश्‍वर चौक, सिटीप्राईड, पंचमी, लक्ष्मीनारायण चौक आणि स्वारगेट आदी ठिकाणी बसथांबे आहेत. त्यातील बहुतांश ठिकाणच्या थांब्यांचे काम सुरू असल्यामुळे ते हलविण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

सातारा रस्त्यावरील बसथांब्यांचे काम सुरू असल्यामुळे या रस्त्याच्या मधोमध सर्वत्र राडारोडा पडलेला आहे. त्यामुळे प्रवाशांना बस नक्की कुठे थांबेल याचा अंदाज बांधत उभे रहावे लागते आहे. पीएमपी बस मुख्य रस्त्यावर आल्याने वाहतूककोंडीत भर पडत आहे. तसेच सातारा रस्त्यावर मुख्य रस्त्याला लागूनच फक्त फलक लावून बसथांबे सुरू करण्यात आले आहेत. त्या बसथांब्यांवर रस्त्यातच  नागरिक उभे असतात. त्यामुळेसुद्धा वाहतूककोंडीत भर पडते.

यांसारख्या समस्या असताना ठेकेदारी बसचालक आपला मनमानी कारभार करत आहेत. मुख्य रस्त्यावर थांब्यावर चालकांकडून बस थांबविली जात नाही. त्यामुळे ज्येष्ठांना धावतपळत जाऊन बस पकडावी लागत आहे. तसेच मुख्य रस्त्यावरील सिग्नलचेदेखील त्यांच्याकडून पालन होत नसल्याचे पाहणीदरम्यान समोर आले आहे.

बसचालकांना स्पीड लिमिट हवे

सातारा रस्ता हा सतत वर्दळीचा आहे. या परिसरातून अनेक वाहने जात असतात. त्याबरोबरच अनेक पादचार्‍यांना हा रस्ता अनेकदा ओलांडावा लागतो. मात्र, सुसाट असणार्‍या बसमुळे ते कधी-कधी शक्य होत नाही. पद्मावती चौक, अप्पर इंदिरानगर यांसह शहरात अन्य ठिकाणी सुसाट पीएमपी बसचालकांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे सुसाट बसचालकांवर दंडात्मक कारवाई करत, बसला स्पीड लिमिट असायलाच हवे, अशी मागणी वाहनचालक, प्रवासी, नागरिक यांच्याकडून केली जात आहे.