होमपेज › Pune › पुणे स्थानकावर होत नाही प्रवाशांची तपासणी 

निपाहचे रेल्वेला गांभीर्य नाही

Published On: May 24 2018 1:33AM | Last Updated: May 24 2018 1:26AMपुणे: प्रतिनिधी 

केरळमध्ये निपाह विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीसंदर्भात मध्य रेल्वेचा पुणे विभाग अद्यापही ढिम्म असून, केरळहून येणार्‍या प्रवाशांच्या तपासणीसंदर्भात रेल्वे स्थानकावर काहीही व्यवस्था करण्यात आली नसल्याचे दिसते.

केरळहून पुण्यात चार रेल्वे दाखल होतात. पूर्णा व एर्नाक्युलम एक्स्प्रेस आठवड्यातून दोनदा, त्रिवेंद्रम-मुंबई दर सोमवारी तर कन्याकुमारी-मुंबई एक्स्प्रेस दररोज पुणे मार्गे धावते. केरळमधून पुण्यात दररोज सुमारे दोनशे प्रवासी उतरतात. मात्र निपाह विषाणूंचा त्यांना प्रादुर्भाव झाला आहे की नाही याची यंत्रणाच पुणे स्थानकावर नाही. यामुळे पुणे शहरात निपाहचा विषाणू घुसखोरी करेल व त्याचा फैलाव होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

केरळहून पुण्यात दाखल झालेल्या काही प्रवाशांशी बुधवारी संपर्क साधला असता, निपाहची धास्ती वाटत असून, पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची चाचणी सुरू केल्यास प्रवासी नक्कीच सहकार्य करतील, अशी माहिती संजय सोहनी या प्रवाशाने दिली आहे. मी मूळची कोची येथील असून, पुण्यात लग्नानिमित्त आले आहे. माध्यमांमधून जशी भीती दाखविण्यात येत आहे, तसे वातावरण केरळमध्ये नसून ठराविक भागातच निपाहचा फैलाव झाला आहे, असे मत स्मिता कन्नेपल्ली या महिला प्रवाशाने व्यक्त केले आहे. 

निपाहबाबत खबरदारी घेऊ
डॉक्टरच्या टीमशी आम्ही चर्चा करत असून ज्या उपाययोजना करता येतील, त्या आम्ही करूच. निपाह बाबत जनजागृतीचे व कोणती खबरदारी घेण्यात यावी, याबाबत मार्गदर्शनाचे काम येत्या काही दिवसात करण्याचे विचाराधीन असून प्रवासी सहकार्य करतील, अशी मला खात्री वाटते.  -संजय कुमार, प्रभारी जनसंपर्क अधिकारी