होमपेज › Pune › निपाहवर लस अद्याप नाही

निपाहवर लस अद्याप नाही

Published On: May 24 2018 1:33AM | Last Updated: May 24 2018 1:24AM पुणे : प्रतिनिधी

‘निपाह व्हायरस’बाबत अद्याप लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे हा आजार होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हाच त्यापासून बचाव करण्याचा एक पर्याय आहे. सध्या तरी पुण्यात ‘निपाह व्हायरस’चा काही धोका नाही, अशी माहिती पुण्यातील ‘राष्ट्रीय विषाणू संस्था’ (एनआयव्ही)चे संचालक डॉ. देवेंद्र मोरया यांनी दिली.

सध्या तरी बाजारात कोणतीही लस उपलब्ध नाही. तसेच कोणतीही संस्था सध्या लस तयार करत नसल्याचे आरोग्य विभागातील अधिकारी सांगतात. बाधित क्षेत्रात केंद्रीय आरोग्य विभागाचे ‘एनसीडीसी’चे पथकही गेले असून, ते विषाणूंचा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत, असे सांगण्यात आले.

‘निपाह व्हायरस’ या विषाणूच्या आजारावर सध्या रॅबाविरिन हे विषाणूविरोधी औषध वापरले जात आहे. पण प्रामुख्याने लक्षणावरूनच उपचार करण्यात येत आहेत. या आजाराचा प्रसार रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे होतो, त्यासाठी या रुग्णांच्या संपर्कात न येणे, तसेच त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टर किंवा आरोग्य स्टाफ यांनी विविध वैद्यकीय उपकरणांचा वापर करणे आवश्यक असल्याची माहिती डॉ. मोरया यांनी दिली. एनआयव्ही येथे किती रुग्णांचे सँपल्स आले आणि त्यापैकी किती रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले याबाबत मात्र त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. 

एका गावातीलच आजार
छोट्या गावातून आलेला हा आजार आहे.  केवळ केरळच्या एका जिल्ह्यापुरता मर्यादित आहे. ते सोडून कोठेही प्रसार नाही. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला कळविण्यात आलेली आहे. त्याचा प्रसारही फारसा होत नसल्याने विमानांनी आलेल्या प्रवाशांची स्क्रीनिंग करण्याची आवश्यकताही नाही. तसेच या आजाराबाबत  सध्या कोणतीही लस उपलब्ध  नाही.  -डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्व्हेक्षण अधिकारी.