Thu, Jul 18, 2019 00:01होमपेज › Pune › देहूगाव, हिंजवडीसह नऊ गावे पिंपरी पालिकेत समाविष्ट होणार

देहूगाव, हिंजवडीसह नऊ गावे पिंपरी पालिकेत समाविष्ट होणार

Published On: Jan 13 2018 1:14AM | Last Updated: Jan 13 2018 1:02AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी

देहूगाव, गहुंजे आणि हिंजवडीसह नऊ गावे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट करून घेण्याबाबत महापालिकेने पुन्हा  जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. महापालिका आयुक्तांनी पुणे विभागीय आयुक्तांना 7 एप्रिल 2017 रोजी पत्र पाठवून ही गावे महापालिका हद्दीत समावेश करण्याविषयी सरकारकडे उचित अहवाल सादर करण्याची विनंती केली आहे, तर दुसरीकडे 20 जानेवारी रोजी होणार्‍या महासभेसमोर गावे समाविष्ट करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे. यापूर्वी देखील गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा ठराव झाला होता. तथापि, ग्रामस्थांच्या विरोधामुळे तो बारगळला होता.

हिंजवडी, गहुंजे, जांबे, मारुंजी, माण, नेरे आणि सांगवडे ही सात गावे महापालिकेत समाविष्ट करण्याबाबतचा ठराव महासभेने पारित केला. त्यानंतर 3 जून 2015 रोजी याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला; परंतु 31 मार्च 2015 रोजी पुणे महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरणाची (पीएमआरडीए) स्थापना झाल्याने हिंजवडी, गहुंजे, जांबे, मारुंजी, माण, नेरे आणि सांगवडे ही सात गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची आवश्यकता नसल्याचे राज्याच्या नगरविकास विभागाने स्पष्ट केले. 

राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 7 मे 2013 रोजी बैठक झाली. या बैठकीत पिंपरी महापालिकेत चाकणसह, देहू, आळंदी, म्हाळुंगे, मोई, निघोजे, कुरुळी, नाणेकरवाडी, खराबवाडी, कडाची वाडी, चिंबळी, केळगाव, खालुंबरे, गहुंजेचा समावेश करणे शक्य आहे का, याची चर्चा झाली.

याबाबतचा अभ्यास करून परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी, पिंपरी महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी राज्य सरकारकडे सादर करावा, असा निर्णय घेण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर महापालिका हद्दीत नवीन गावे समाविष्ट करण्याबाबत महापालिकेच्या सर्व पदाधिकार्‍यांची 30 ऑगस्ट 2013 रोजी बैठक घेण्यात आली. या बैठकीत महापालिका हद्दीच्या उत्तरेकडील 14 गावे आणि पश्‍चिमेकडील सहा गावे समाविष्ट करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. 

त्या अनुषंगाने महापालिकेच्या उत्तरेकडील आळंदी, चिंबळी, कुरुळी, मोई, निघोजे, देहू, विठ्ठलनगर ही सात गावे आणि पश्‍चिमेकडील हिंजवडी, जांभे, माण, मारुंजी, नेरे, गहुंजे, सांगवडे अशी एकूण 14 गावे समाविष्ट करून घेण्याबाबतचा प्रस्ताव महासभेसमोर मंजुरीसाठी ठेवला गेला; मात्र महापालिका सभेने 10 फेब्रुवारी 2015 रोजी हिंजवडी, जांभे, माण, मारुंजी, नेरे, गहुंजे आणि सांगवडे ही सात गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यास मान्यता दिली. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी हा प्रस्ताव 3 जून 2015 रोजी राज्य सरकारकडे पाठविला होता; मात्र राज्य सरकारने तब्बल एका वर्षाने म्हणजेच 3 जून 2016 रोजी हा प्रस्ताव नामंजूर केला.

तरीदेखील महापालिका आयुक्तांनी पुण्याच्या विभागीय आयुक्तांना 7 एप्रिल 2017 पत्र पाठवून पाठपुरावा कायम ठेवला. हिंजवडी, जांभे, माण, मारुंजी, नेरे, गहुंजे व सांगवडे ही सात गावे; तसेच महापालिका हद्दीच्या उत्तरेकडील इंद्रायणी नदीच्या नैसर्गिक हद्दीपर्यंतच्या देहूगाव, विठ्ठलनगर या गावांचे देहूरोड कॅन्टोन्मेंट क्षेत्र सोडून उर्वरित क्षेत्र आणि आळंदी नगरपरिषदेचे संपूर्ण क्षेत्र पिंपरी महापालिका हद्दीत समावेश करण्याविषयी सरकारडे उचित अहवाल सादर करण्याची विनंती केली.

ही गावे महापालिकेशी भौगोलिकदृष्ट्या संलग्न असल्याने ती महापालिकेत समाविष्ट करणे गरजेचे आहे. देहूगाव या तीर्थक्षेत्र परिसराचा आणि पश्‍चिमेकडील सात गावांचा नियोजनबद्ध-सुनियोजित विकास होण्यासाठी आणि नागरिकांना देखील शहरी नागरी सुविधा उपलब्ध करून देणे या भागाचा विकास पाहता गरजेचे आहे. महापालिका प्रशासकीय यंत्रणेमार्फत हे शक्य होऊ शकले, असे आयुक्तांनी आपल्या प्रस्तावात म्हटले आहे.