Tue, Jul 23, 2019 17:11होमपेज › Pune › निगडी-दापोडी प्रशस्त मार्गही पडतोय अपुरा

निगडी-दापोडी प्रशस्त मार्गही पडतोय अपुरा

Published On: Aug 23 2018 1:28AM | Last Updated: Aug 23 2018 1:03AMपिंपरी : मिलिंद कांबळे

ग्रेडसेपरेटर, बीआरटीएस आणि पुणे मेट्रोच्या मार्गिकेमुळे पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील निगडी ते दापोडी हा रस्ता वाहतुकीस सध्या अपुरा ठरत आहे. परिणामी, 180 फुटांचा प्रशस्त रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. एकेकाळी शहराच्या नावलौकीकात भर टाकणारा हा प्रशस्त मार्ग आता शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे. 

पिंपरी-चिंचवड शहराचे दोन भाग करणार्‍या हा 12.50 किलोमीटर अंतराचा  निगडी ते दापोडी मार्ग आहे. हा ग्रेडसेपरेटर मार्ग सन 2006 मध्ये विकसित करण्यात आला. पहिल्या टप्प्यात पिंपरी ते नाशिक फाटा, दुसर्‍या टप्प्यात पिंपरी ते निगडी आणि तिसर्‍या टप्प्यात नाशिक फाटा ते फुगेवाडी ग्रेडसेपरेटर तयार झाला. पुढे सीएमईने जागा ताब्यात दिल्यानंतर दापोडीचा रस्ता विकसित केला गेला. या रस्त्यासाठी तब्बल 600 कोटी रूपये पालिकेने खर्च केले आहेत. 

सर्व्हिस रस्त्यावर दोन्ही बाजूने बीआरटीसाठी प्रत्येकी 30 फूट रूंदीचा स्वतंत्र मार्ग 2012 ला तयार करण्यात आल. त्यामुळे एकूण 60 फूट रस्ता कमी झाला. त्यामुळे पदपथाची रूंदी कमी करण्यात आली. मात्र, फारसा फायदा झाला नाही. खराळवाडी ते निगडीच्या भक्ती-शक्ती समुह शिल्प चौकापर्यंत मेट्रो सर्व्हिस रस्त्यावरून जाणार आहे. मेट्रोच्या पिलरसाठी 6 फूटाने रस्ता आणखी कमी होणार आहे. तसेच, मेट्रोच्या पिलरमुळे खराळवाडी ते दापोडीपर्यंत ग्रेडसेपरेटरच्या मुख्य मार्गावरील दुभाजक आणखी 4 फुटाने वाढविले जाणार असल्याने तो रस्ताही अरूंद होणार आहे. सध्या मेट्रो कामासाठी दोन्ही बाजूने एक लेन बंद केली आहे. 

दरम्यान, ग्रेडसेपरेटरची उंची केवळ 4.5 मीटर ठेवल्याने जड वाहने अडकून पडण्याचे सत्र कायम आहे. पुलाच्या स्लॅबला वाहने धडकून तो कमकुवत होत आहे. त्यामुळे जड वाहने सर्व्हिस रस्त्यावरून ये-जा करीत आहेत. शहरातील वाहने बहुतांश वेळा सर्व्हिस रस्त्याने ये-जा करत असल्याने सर्व्हिस रस्त्यांवर वाहनांची संख्या अधिक आहे. मात्र, तो  रस्ता अरूंद झाल्याने कोंडीत भर पडत आहे. रस्त्यावरील बेशिस्तपणे पार्क केलेली वाहने, अनधिकृत टपर्‍या व विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतुक कोंडीस प्रोत्साहन मिळत आहे. 

लोकसंख्या वाढल्याने तसे, वाहनांची संख्या वाढल्याने खासगी वाहतुक मोठ्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशस्त रस्तेही अपुरे पडू लागले आहेत. परिणामी, त्रस्त वाहनचालक हा मार्ग टाळून इतर मार्गाचा अवलंब करत आहेत. 

अशी आहे प्रत्येक मार्गाची रुंदी 

ग्रेडसेपरेटरचा मार्ग 60 फूट, बीआरटी मार्ग 21 फूट, सर्व्हिस रस्ता 60 फूट, मेट्रोचे पिलर 6 फूट, पदपथ 15 फूट, हरित पट्टा 18 फूट. एकूण 180 फूट. (काही ठिकाणी जागा ताब्यात न मिळाल्याने ही रुंदी आणखी कमी आहे.)