Sun, May 26, 2019 00:37होमपेज › Pune › महिन्याभरात विद्यापीठास मिळणार नवे कुलसचिव

महिन्याभरात विद्यापीठास मिळणार नवे कुलसचिव

Published On: Apr 19 2018 1:36AM | Last Updated: Apr 19 2018 12:46AMपुणे : प्रतिनिधी 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी 28 जण पात्र झाले असून, त्यांची मुलाखत कुलपतींनी स्थापन केलेल्या निवड समितीद्वारे होणार आहे. यासाठी साधारण महिनाभराचा कालावधी लागणार आहे, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली. दरम्यान, पात्र उमेदवारांमध्ये विद्यापीठाच्या विभागांमध्ये काम करणारे प्राध्यापक आणि प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव म्हणून डॉ. अरविंद शाळिग्राम हे साधारण एक वर्षापासून प्रभारी कुलसचिव म्हणून कारभार पाहत आहेत. त्यामुळे विद्यापीठाला पूर्णवेळ कुलसचिव मिळाला पाहिजे, अशी फार दिवसांपासूनची मागणी होती. त्यानुसार कुलसचिव पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. विद्यापीठ प्रशासनाने 40 अर्जांची छाननी केल्यानंतर 28 जण पात्र ठरले आहेत. या 28 जणांची निवड समितीद्वारे मुलाखत होणार आहे. समितीत दोन कुलगुरू, सिनेट आणि मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य, औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञ आदींचा समावेश राहणार आहे. या निवड प्रक्रियेचे नियोजन शक्य तितक्या लवकर करण्यात येणार आहे. दरम्यान, डॉ. शाळिग्राम, डॉ. प्रफुल्ल पवार, श्रीरंग बाठे, सुनील अत्रे आदींचे पात्र उमेदवारांमध्ये नाव आहे.

याचबरोबर विद्यापीठ प्रशासनाने वित्त व लेखा अधिकारी पदासाठी देखील अर्ज मागविले होते. यामध्ये सध्याच्या विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागाच्या अधिकारी डॉ. विद्या गारगोटे यांच्यासह एकूण सहा उमेदवार पात्र झाले आहेत. तसेच इनोव्हेशन अँण्ड इन्क्युबेशन विभागाचे संचालक अशा पदांची निवड करण्यासाठी समिती मागविली आहे. या समितीची मागणी करून देखील पंधरा दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. परंतु मॅनेजमेंट कौन्सिलच्या निर्मितीअगोदर समितीला बोलविण्यात अडचणी होत्या.