Tue, Jun 25, 2019 13:07होमपेज › Pune › पश्चिम महाराष्ट्रात नवीन वीजमीटर मुबलक प्रमाणात उपलब्ध

पश्चिम महाराष्ट्रात नवीन वीजमीटर मुबलक प्रमाणात उपलब्ध

Published On: May 24 2018 1:33AM | Last Updated: May 24 2018 12:18AMपुणे : प्रतिनिधी 

पश्चिम महाराष्ट्रात नवीन वीजजोडण्या व नादुरुस्त वीजमीटर बदलण्यासाठी महावितरणच्या कार्यालयांमध्ये सद्यस्थितीत सिंगल व थ्री फेजचे 1 लाख 14 हजार 986 नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत. नवीन वीजमीटरचा तुटवडा असल्याच्या माहितीवर विश्वास ठेवू नये. तसेच नवीन वीजजोडणीच्या प्रक्रियेत स्वयंघोषित एजंटांनाही थारा देऊ नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यासाठी सिंगल फेजचे 25 हजार आणि 10-40 अ‍ॅम्पिअर थ्री फेजचे 5014 नवीन वीजमीटर नुकतेच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासह आता या सर्व जिल्ह्यांमध्ये सिंगल फेजचे 91 हजार 449 आणि थ्री फेज 10-40 अ‍ॅम्पिअरचे 23 हजार 537 नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत. पुणे जिल्ह्यात (कंसात - थ्री फेज 10-40 अ‍ॅम्पिअर) सिंगल फेजचे 51,291 (8977), सातारा जिल्ह्यात सिंगल फेजचे 8242 (3611), सोलापूर जिल्ह्यात 10636 (4704), कोल्हापूर जिल्ह्यात 6499 (3880) आणि  सांगली जिल्ह्यात 14,781 (2365) नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या नवीन वीजमीटरची संख्या ही सद्यस्थितीत नवीन वीजजोडणी तसेच सदोष किंवा नादुरुस्त वीजमीटर बदलण्याच्या तुलनेत अधिक आहे. पेडपेडींगमधील नवीन वीजजोडणी ताबडतोब देण्याचे तसेच नादुरुस्त वीजमीटरसुद्धा तातडीने बदलण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी दिले आहेत. नवीन मीटर लावल्यानंतर त्याची महावितरण अंतर्गत ईआरपीमध्येही (एंटरप्रायजेस रिसोर्स प्लॅनिंग) तत्काळ नोंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

वीजमीटर उपलब्ध नसल्याचे कारण सांगून ग्राहकांची दिशाभूल केल्याच्या तक्रारी  आल्यास संबंधित कर्मचार्‍यांविरुद्ध कारवाई करण्यात  येणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

स्वयंघोषित एजंटांना थारा देऊ नका 

महावितरणच्या सर्व सुविधा सुटसुटीत व पारदर्शक असतानाही स्वयंघोषित एजंट म्हणून आर्थिक फटका देणार्‍या व्यक्तींना वीजग्राहकांनी थारा देऊ नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. महावितरणमध्ये नवीन वीजजोडणी, वाढीव वीजभार मंजुरी, नावात बदल आदींबाबतची प्रक्रिया सुटसुटीत व पारदर्शक करण्यात आली आहे. महावितरणची वेबसाईट किंवा मोबाईल अ‍ॅपद्वारे नवीन वीज जोडणीसाठी अर्ज करण्याची सोय आहे. ग्राहकांना कोणतीही अडचण आल्यास, तक्रार असल्यास त्यांनी संबंधित कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना किंवा कार्यकारी अभियंत्याच्या निदर्शनास आणून द्यावी.