Thu, Apr 25, 2019 14:04होमपेज › Pune › महापालिकेचे पाण्याच्या पुनर्वापराचे नवे धोरण

महापालिकेचे पाण्याच्या पुनर्वापराचे नवे धोरण

Published On: Feb 25 2018 1:16AM | Last Updated: Feb 25 2018 12:19AMपिंपरी : मिलिंद कांबळे

पिंपरी-चिंचवड शहरातील लोकसंख्या दरवर्षी 7 ते 8 टक्कांने वाढत आहे. त्यामुळे शहराला 470 एमएलडी पाणही अपुरे पडत आहे. शहराची गरज भागविण्यसााठी सांडपाण्याचा पुनर्वापर  व पुर्नचक्रीकरण करण्याचे नवे धोरण पिंपरी-चिंचवड महापालिकेने निश्‍चित केले आहे. सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन त्यांची अंमलबजावणी होईल.

शहरासाठी दररोज 470 एमएलडी मान्यतेपेक्षा 10 ते 15 एमएलडी अधिक पाणी उपसा पवना नदीवरील रावेत बंधार्‍यातून केला जातो. मात्र, पाण्याची 35 टक्केपेक्षा अधिक होणारी गळती आणि अनधिकृत नळजोड तसेच, वाढत्या लोकसंख्येमुळे पिण्याचे पाणी कमी पडत आहे. परिणामी, शहरातील अनेक भागांत विशेषता सखल परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने व अपुरा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. पाणी गळती रोखण्यासाठी अमृत अभियान अंतर्गत पालिकेने ठोस उपाययोजना सुरू केल्या आहेत. तसेच, आंद्रा-भामा आसखेड धरण पाणी योजना आणि प्रलंबित पवना बंद जलवाहिनी योजना मार्गी लावण्याचे प्रशासनाचे धोरण आहे.

संपूर्ण शहराला सम प्रमाणात 24 तास पाणीपुरवठा करण्याचे पालिकेचे ध्येय आहे. त्यासाठी सांडपाण्याचा पुनर्वापरावर भर दिला जाणार आहे. शहरात 9 विविध ठिकाणी 13 मैलाशुद्धिकरण केंद्र आहेत. त्यातील सुमारे 240 ते 250 एमएलडी घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. मैलाशुद्धिकरण केंद्र व पंपींग स्टेशनमधील विद्युत पुरवठा खंडित झाल्यास सांडपाण्यावर प्रक्रिया होत नाही. त्यामुळे केंद्र व पंपींग स्टेशनसाठी अखंडीत वीजपुरवठा करण्यासाठी ‘एक्सप्रेस फिडर’ बसविण्यात येणार आहेत. सांडपाण्यावर प्रक्रियेवर नियंत्रण व तपासणीसाठी स्मार्ट यंत्रणा ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत कार्यान्वित करण्यात येणार आहे.

मैलाशुद्धिकरण केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी सध्या नदी पात्रात सोडून दिले जाते. त्यामुळे त्या पाण्याचा शहराला पूर्णपणे उपयोग होत नाही. थोड्या प्रमाणात सार्वजनिक  उद्यानासाठी ते पाणी वापरले जाते. पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी शहरात ‘पाणी पुनर्वापर’ धोरण राबविण्यात येणार आहे. त्याकरीता शहरातील ठिकठिकाणी पाणी पुर्नचक्रीकरणाचे प्रकल्प उभे केले जाणार आहेत. त्यामुळे शहरातील अनेक भागात प्रकिया केलेले पाणीपुरवठा करणे सुलभ होईल. प्रक्रिया केलेले पाणी औद्योगिक, बांधकाम, निवासी, सार्वजनिक, शैक्षणिक संस्था, लघुउद्योग, खासगी उद्यान आदींना वापरासाठी देण्यात येणार आहे. या प्रकारे पाण्याचा पुनर्वापरासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. शहरातील काही मोठ्या सोसायट्या ‘किचन’ व ‘बाथरूम’मधील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा वापर करण्याचा प्रकल्प राबवित आहेत. त्यातूनही पाण्याचा पुनर्वापर होत आहे. मात्र, हे प्रमाण नगण्य आहे. भविष्यात हे प्रमाण वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.

पुनर्वापरामुळे  पिण्याचा पाण्यात बचत

शहराची वाढती लोकवस्ती आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन पाण्यासंदर्भात विविध उपाययोजना गांभीर्याने राबविण्यात येत आहेत. शहराला 24 बाय 7 योजनेअंतर्गत सम प्रमाणात पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्टे आहे. त्यानुसार पालिका प्रशासन पावले टाकत आहे. त्याचाच भाग म्हणजे मैलाशुद्धिकरण केंद्रातील प्रकिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर व पुर्नचक्रीकरणाचे धोरण प्रशासनाने निश्‍चित केले आहे. त्यातून वापरासाठी पाणी उपलब्ध होऊन काही प्रमाणात पाण्याची गरज भागणार आहे. परिणामी, पिण्याचा पाण्यात बचत होईल, असे पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.