Mon, Apr 22, 2019 01:42होमपेज › Pune › ग्रेडसेपरेटर मार्गावर आता शंकरवाडीत नवा ‘मर्ज आऊट’

ग्रेडसेपरेटर मार्गावर आता शंकरवाडीत नवा ‘मर्ज आऊट’

Published On: Jun 11 2018 1:07AM | Last Updated: Jun 11 2018 12:25AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी चिंचवड शहरात पुणे मेट्रोचे काम जोरात सुरू आहे. खराळवाडी ते दापोडी हॅरिस पुलापर्यंत मेट्रोचे पिलर उभे राहिलेले दिसत आहेत. या कामामुळे वाहतूक कोंडी होत असून, ती सुरळीत व्हावी म्हणून कासारवाडीतील शंकरवाडी येथील पेट्रोल पंपासमोर ग्रेडसेपरेटर मार्गावर नवा ‘मर्ज आऊट’ तयार करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांना सर्व्हिस रस्त्यावर वळण घेता येणार आहे.

मेट्रोचे काम शहरात वेगात सुरू आहे. पिंपरी चौक, मोरवाडी चौकातील काम बीआरटीएस मार्गात केल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे ते काम बंद आहे. मात्र, खराळवाडी ते दापोडीच्या हॅरिस पुलापर्यंत मेट्रोचे काम वेगात सुरू आहे. कासारवाडीतील नाशिक फाटा चौकात नव्याने काम हाती घेण्यात आले आहेत. शंकरवाडीपासून मेट्रो डावीकडे वळण घेऊन ग्रेडसेपरेटर व सर्व्हिस रस्त्याच्या दुभाजकावरून पुढे कासारवाडीच्या दिशेने जाणार आहे. त्यासाठी दुभाजकावरील सुमारे 60 झाडांचे स्थलांतर करून पुनर्रोपण करण्यात आले आहे. पिलर व नाशिक फाटा स्टेशनचे काम सुरू करण्यासाठी त्या ठिकाणी ग्रेडसेपरेटर व सर्व्हिस रस्त्यावर लोखंडी बॅरीकेटसही लावण्यात  येत आहेत. नाशिक फाटा चौकातून पिंपरीच्या दिशेने ग्रेडसेपरेटरमधून 400 ते 500 मीटर पुढे गेल्यानंतर शंकरवाडीतील पेट्रोल पंपाजवळ नवीन ‘मर्ज आऊट’ तयार करण्यात आला आहे. 

वाहतुक पोलिसांशी चर्चा करून पुणे मेट्रोने हा ‘मर्ज आऊट’ तयार केला आहे. त्यामुळे कासारवाडी रेल्वे स्थानक, खासगी बस व रिक्षाचालक आणि दुकानदारांच्या अतिक्रमणामुळे अरूंद झालेल्या रस्त्यावर होणारी वाहतुक कोंडी कमी होणार आहे, असा दावा मेट्रोने केला आहे. लवकरच हा ‘मर्ज आऊट’ वाहतुकीस खुला केला जाणार आहे. आठवड्याभरापूर्वी कासारवाडीत बीआरटीएस मार्गातून ग्रेडसेपरेटरमध्ये जाण्यासाठी ‘मर्ज इन’ बांधण्यात आला आहे. त्याचा वापर वाहनांकडून केला जात आहे. मात्र, त्या ठिकाणी नाम व दिशादर्शक फलक तसेच, दिवे नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जागोजागी ‘मर्ज इन’ आणि ‘मर्ज आऊट’ केल्याने ग्रेडसेपरेटरमधील एक्सप्रेस मार्ग ‘गल्ली’ मार्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

मार्गावरील सुरक्षा उपाययोजना वाढविण्याची गरज

मेट्रो कामासाठी पिंपरी ते दापोडीपर्यंतचा ग्रेडसेपरेटर मार्गातील दोन्ही बाजूने प्रत्येकी एक लेन बंद केली आहे. तसेच, उर्वरित लेनवरून वाहतुक करताना अपघात होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी पुरेशा प्रकाश व्यवस्था नाही. मेट्रोने लावलेले लाल रंगाचे दिवे ही गायब झाले आहेत. मर्ज इन व मर्ज आऊटच्या ठिकाणी फलक व दिवे नसल्याने वाहने दुभाजक व गतीरोधकास धडकत आहेत. अनेक ठिकाणी अर्धवट स्थितीत गतीरोधक असल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. मेट्रोने नेमलेले वाहतुक मदतनीस केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. दापोडीच्या उड्डाणपुलावरून फुगेवाडी चौकात आले असता, मेट्रोच्या पिलरमुळे सिग्नल दिसत नसल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. ठिकठिकाणी नाम व दिशादर्शक फलक लावून लाल दिवे लावण्याची मागणी त्रस्त वाहन चालकांकडून होत आहे.