Sat, Jul 20, 2019 08:34होमपेज › Pune › राज्यातील नवीन अभियांत्रिकी महाविद्यालयांना परवानगी नको

राज्यातील नवीन अभियांत्रिकी महाविद्यालयांना परवानगी नको

Published On: Jan 19 2018 1:55AM | Last Updated: Jan 19 2018 12:50AMपुणे : गणेश खळदकर 

राज्यात गेल्या तीन वर्षांपासून अभियांत्रिकीच्या निम्म्याहून अधिक जागा रिक्त राहत आहेत. त्यामुळे राज्यात 2018-19 या वर्षामध्ये अभियांत्रिकीच्या पदवीसाठी आणि पॉलीटेक्नीकच्या पदविकेसाठी नविन महाविद्यालयांना परवानगी देण्यात येवू नये अशी विनंती राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद अर्थात एआयसिटीईला केली आहे. त्यामुळे एआयसीटीईने तंत्रशिक्षण विभागाची विनंती मान्य केल्यास यंदा राज्यात नविन एकही अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

राज्यात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना प्रचंड मागणी होती. परंतु गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी शाखेकडे पाठ फिरवली असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे अभियांत्रिकीची पदवी आणि पॉलिटेक्नीकची पदविका यांना विद्यार्थीच मिळत नसल्याचे दिसत आहे. एकीकडे उपलब्ध महाविद्यालयांना विद्यार्थी मिळत नसल्याचे वास्तव असताना नविन महाविद्यालय सुरू करण्यासाठीचे प्रस्ताव मात्र प्राप्त होत आहेत. त्यामुळेच तंत्र शिक्षण विभागाने एआयसिटीईला गेल्या तीन वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची आकडेवारी दिली आहे. यामध्ये अभियांत्रिकीच्या पदवीसाठी 2015-16 मध्ये 42 टक्के,2016-17 मध्ये 44.78 टक्के तर 2017-18 मध्ये 40.87 टक्के जागा रिक्त राहिल्याचे कळवले आहे. तसेच पॉलिटेक्नीकच्या पदविकेसाठी 2015-16 मध्ये 48.34 टक्के,2016-17 मध्ये 55.94 टक्के तर 2017-18 मध्ये तब्बल 56.64 टक्के जागा रिक्तच राहिल्याचे सांगितले आहे.

राज्यात रायगड जिल्ह्यातील लोनारे या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नोलॉजीकल विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. विद्यापीठाने पुढील पाच वर्षांचे नियोजन करत असताना पहिल्या वर्षी ंम्हणजेच 2018-19 या वर्षासाठी नविन महाविद्यालयांची आवश्यकता नसल्याचे कळविले आहे.तसेच भविष्यात जर गरज पडली तर नविन महाविद्यालयांना परवानगी देण्यात येईल तसेच संलग्नता देखील देण्यात येणार असल्याचे कळवले आहे.त्यामुळे यंदा नविन अभियांत्रिकी तसेच पॉलिटेक्नीक महाविद्यालयांना परवानगी देण्यात येवू नये अशी विनंती उच्च शिक्षण विभागाकडून एआयसिटीईला करण्यात आली आहे.