Mon, Jun 17, 2019 02:14होमपेज › Pune › अखेर ‘आरटीओ’ला नवी इमारत

अखेर ‘आरटीओ’ला नवी इमारत

Published On: Dec 31 2017 1:48AM | Last Updated: Dec 31 2017 12:08AM

बुकमार्क करा
पिंपरी : नरेंद्र साठे    

पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय 2017 च्या अखेरीस का होईना; पण नव्या इमारतीत स्थलांतरित झाले. उपप्रादेशिक अधिकारी आनंद पाटील यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नवीन इमारतीमधून काम सुरू करणार असल्याचे सांगून तशी पावले टाकण्यास सुरुवात केली. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मोशी प्राधिकरणातील नवीन इमारतीमधून ‘आरटीओ’च्या कामास सुरुवात झाली.

मोशी प्राधिकरणातील सेक्टर सहामध्ये उभारण्यात आलेल्या ‘आरटीओ’च्या नवीन इमारतीचे उद्घाटन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 11 जुलै 2014 मध्ये करण्यात आले होते. उद्घाटन होऊन सुमारे तीन वर्षे  होऊनही या नवीन इमारतीत कार्यालयीन कामाकाजाविना शुकशुकाट होता. या इमारतीचे भूमिपूजन 3 जानेवारी 2012 रोजी अजित पवार यांच्याच हस्ते झाले होते. दोन वर्षांमध्ये इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन तिचे उद्घाटन झाले. यासंदर्भात ‘पुढारी’ने सतत पाठपुरावा केला होता. एक उपप्रादेशिक अधिकारी बदलून गेले, तरी देखील ‘आरटीओ’ कार्यालय काही केल्या नवीन इमारतीत स्थलांतरित झाले नाही. अखेर डिसेंबर 2017 चा मुहूर्त लागला. 

राज्यातील ‘आरटीओ’ कार्यालयांना 250 मीटरचा ट्रॅक तयार करण्याच्या सूचना न्यायालयाने केल्या होत्या. त्यानुसार मोशी प्राधिकरणाकडून ‘आरटीओ’ला जागा देऊन नवीन ‘आरटीओ’ इमारतीच्या मागेच 250 मीटरचा टॅ्रक तयार करण्यात आला. 

पुण्याअगोदर पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानेही ट्रॅक तयार करून त्यावर वाहनांच्या चाचण्या घेण्यास सुरुवात केली. वाहनांची फिटनेस चाचणी आता या ट्रॅकवर अतिशय चोख आणि काटेकोर करण्यास सुरुवात झाली आहे. मागेल त्याला रिक्षा परवाना देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयामुळे जुलैपासून केवळ पिंपरी-चिंचवड भागात तीन हजार रिक्षा परवान्यांचे वाटप करण्यात आले आहे. अगोदरच रिक्षांची मोठी संख्या असल्याने वाहतुकीला अडथळा ठरत असल्याची नागरिकांची ओरड असते. त्यात या तीन हजार रिक्षांची पूर्वीच्या सुमारे साठ हजार रिक्षांमध्ये भर पडली आहे. दरम्यान, 2017  मध्ये ‘आरटीओ’ ला  इमारत मिळाली हीच काय ती स्वागतार्ह बाब.