Sun, Aug 25, 2019 03:36होमपेज › Pune › नवीन विमानतळ पोलिस ठाण्याचे काम रखडले

नवीन विमानतळ पोलिस ठाण्याचे काम रखडले

Published On: Jun 23 2018 1:22AM | Last Updated: Jun 23 2018 12:50AMयेरवडा : वार्ताहर

पुणे-नगर रोडवर इनोर्बिट मॉलशेजारी नवीन विमानतळ पोलिस ठाण्याचे भूमिपूजन होऊन वीस महिने उलटले तरी अद्याप बांधकामाला सुरुवात झालेली नाही. बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, बाजूला लावण्यात आलेले पत्रेदेखील खाली पडले आहेत. बांधकाम परवानगीसाठीची फाईल शासनाच्या लालफितीच्या कारभारात अडकली आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत नगर रोडवर इनोर्बिट मॉलच्या शेजार विमानतळ पोलीस ठाण्याचे भूमिपूजन पालक मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते 15 ऑक्टोंबर 2016 रोजी झाले होते. भूमिपूजनावेळी  सहा महिन्यात पोलीस ठाण्याच्या उभारण्यासाठी स्वतः प्रयत्न करू असे जाहीर आश्वासन देणार्‍या पालकमंत्री गिरीश बापट यांची घोषणा हवेतच विरली आहे. 

येरवडा पोलीस ठाण्याच्या विभाजनातून 26 जानेवारी 2008 साली विमानतळची स्थापना करण्यात आली. सध्या असलेल्या विमानतळ पोलीस ठाणे हे  मनपाच्या इमारतीत सुरू आहे.  एक  हजार स्केवर फुटाच्या जागेत पोलिसांना अडचणीत दैनंदिन कामे करावी लागतात. त्यामुळे नगर रोड वरील 26 गुंठे जागेत अद्ययावत पोलीस ठाणे उभारणीचा प्रस्ताव पोलीस प्रशासनाकडून शासनाला पाठविण्यात आला होता. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर चार कोटींचा निधी देण्यात आला होता. याच ठिकाणी परिमंडळ चार पोलीस उपयुक्त कार्यालय किंवा खडकी विभागाचे साहाय्यक  आयुक्त कार्यालय करण्याच्या हालचाली देखील झाल्या होत्या. 

पोलीस ठाण्याच्या इमारत उभारणी करिता ठेकेदाराकडून पाया खोदण्याचे काम हाती घेण्यात आले. पण संबंधित जागेत ड्रेनेज लाईन जात असल्याने पालिकेकडून काम थांबविण्यात आले. त्यानंतर पोलीस प्रशासनाने पालिकेकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर संबंधित बांधकामाची रिवाईज  फाईल मान्यतेसाठी तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे पाठविण्यात आली.पोलीस ठाण्यासाठी इमारत बांधणे आवश्यक असल्याच्या कारणावरून दोन महिन्यांपूर्वी काही अटींवर इमारत बांधण्यासाठी तत्कालीन आयुक्तांनी परवानगी दिल्याची माहिती  वडगांव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकार्‍यांनी दिली. मात्र मनपा आयुक्तांनी नवीन तयार केलेल्या प्लॅनला पोलीस हौसिंग सोसायटींने परवानगी दिली नसल्यामुळे काम सुरु झालेले नाही. त्यामुळे  अद्यापही बंद कामाची परिस्थिती जैसे थे आहे. 

ठेकेदार सचिन साकतकर म्हणाले, मनपा आयुक्तानी मंजूर केलेल्या रिवाईज प्लॅनला पोलीस हौसिंग सोसायटीने  अद्याप परवानगी दिलेली नाही. आपण खड्डा खोदून ठेवल्यामुळे त्याठिकाणी दोन सुरक्षा रक्षक नेमले आहेत. त्यांचा पगार मला गेल्या वीस महिन्यापासून करावा लागत आहे. त्यामुळे काम सुरु होईपर्यंत आपले आर्थिक नुकसान दरमहा होत आहे.कनिष्ठ अभियंता प्रताप बळवे म्हणाले, पालिका आयुक्तांनी ड्रेनेज लाईनपासून काही मीटर अंतर सोडून  इमारत  उभारणीला परवानगी दिली आहे. आता सार्वजनिक बांधकाम खाते व पोलीस दलाने काम करणे आवश्यक आहे.