Mon, Mar 25, 2019 00:00
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › नववर्ष स्वागतासाठी तरुणाई थिरकणार तालावर

नववर्ष स्वागतासाठी तरुणाई थिरकणार तालावर

Published On: Dec 29 2017 1:32AM | Last Updated: Dec 29 2017 1:26AM

बुकमार्क करा
पुणे : ज्योती भालेराव-बनकर 

नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी राहिले आहेत. नुकतेच ख्रिसमसचे सेलिब्रेशन करुन आता सगळी तरुणाई नवीन वर्षाचे स्वागत कशा प्रकारे करायचे या तयारीला लागली आहे. आऊटिंग, सिनेमा, हॅाटेलिंग याबरोबरच ‘पब किंवा डिस्कोथेक’मध्ये जाऊन सेलिब्रेशन करण्याचे प्रमाण काही दिवसात निश्‍चीतच वाढले आहे. शहरातील वाढलेली पबची आणि तेथे सेलिब्रेशनसाठी जाणार्‍यांच्या वाढलेल्या संख्येवरून उत्सव साजरा करण्याच्या पद्धती बदललेल्या दिसत आहेत.

पुणे हे तरुणाईचे शहर म्हणून ओळखले जाते. शिक्षणाची पंढरी व आईटी हब म्हणून शहराची ओळख आहे. शिक्षण व नोकरीनिमित्ताने शहरात देशविदेशातील मुले मुली राहत आहेत. अनेक मोठी, नामांकित महाविद्यालये या ठिकाणी आहेत. त्यामुळे नवीन वर्षाचे स्वागत पुण्यात मोठ्या जल्लोषात केले जाते. कॅालेजच्या तरुणाईकडून या काळात निरनिराळे प्लॅन आखले जातात. अशाच काही तरुण-तरुणींशी दैनिक ‘पुढारी’ने संवाद साधला. काही दिवसांपर्यंत बाहेर हॅाटेलमध्ये जाऊन जेवण करणे म्हणजेच सेलिब्रेशन समजले जात होते. 

अनेकांनी आधीपासूनच पुण्यातील नामांकित पब, डिस्को थेकसाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंग केलेले आहे. या वर्षी 31 डिसेंबरला रविवार येत असल्यामुळे आम्हा नोकरी करणार्‍यांनाही  सेलिब्रेशनची संधी मिळणार आहे, अशी माहिती खराडी येथील आयटी कंपनीत काम करणारा महेश कुलकर्णी याने सांगितले. पुण्यातील गरवारे महाविद्यालयात शिकत असलेली हिमांशी नाईक म्हणते की, न्यु इयर सेलिब्रेशन आणि पब अशीच आमच्या मित्र-मैत्रीणींची संकल्पना आहे. 

पब, डिस्को थेकमध्ये यावेळी अनेक डिस्काउंट अ‍ॅाफर दिल्या जात आहेत. सुरक्षिततेची काळजी घेत आम्ही या कल्चरचाही आनंद घेतो. सुरक्षिततेच्या कारणास्तव नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पोलिस दल आणि अनेक सामाजिक संस्थांकडून दिलेल्या सावधगिरीचे उपाय विचारात घेऊनच नवीन वर्षाचा जल्लोष साजरा करण्यात येणार असल्याचेच अनेकांनी सांगितले आहे.