Thu, Jul 18, 2019 02:15होमपेज › Pune › दौंड-पुणेदरम्यान नवी रेल्वे धावणार

दौंड-पुणेदरम्यान नवी रेल्वे धावणार

Published On: May 04 2018 1:50AM | Last Updated: May 04 2018 12:24AMपुणे : प्रतिनिधी 

मध्य रेल्वेच्या वतीने दौंड ते पुणे स्थानकांदरम्यान नवी रेल्वे सोडण्यात येणार आहे. पहाटे 5 वाजून 40 मिनिटांनी ती दौंड स्थानकावरून पुण्याकरिता सोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या निमित्ताने गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांकडून करण्यात येणारी मागणी अखेर पूर्ण होणार आहे. येत्या आठवडाभरात ही नवी रेल्वे सुरू होणार असून डेमू (डिझेल मल्टिपल युनिट) धावेल की पॅसेंजरचे रेक सोडण्यात येतील, याबाबत माहिती कळू शकली नाही.  सद्यःस्थितीत पुण्याहून दौंड मार्गे उत्तर भारतात सुमारे पन्नास रेल्वे धावतात. 

तर पुणे-दौंडदरम्यान डेमूच्या चार फेर्‍या व शटलच्या दोन फेर्‍या अशा दोन्ही बाजूंनी मिळून सहा फेर्‍या दररोज होतात. सकाळी 7.05 वाजता दौंडहून पुण्याकरिता पहिली गाडी धावते. मात्र त्याआधी गाडीच नसल्याने भल्या पहाटे पुण्यात नोकरी-धंद्यानिमित्त येणारे प्रवासी, दूध, फळ विक्रेते, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी यांची मोठी गैरसोय व्हायची. त्यांना रस्ते मार्गाने पुण्यात पोहोचावे लागायचे. अशांची आता मोठी सोय होणार आहे. 

‘पहाटेची रेल्वे सुरू करण्यात यावी, याकरिता आम्ही सातत्याने पाठपुरावा केला असून त्याला अखेर यश मिळाले. पुणे विभागाचे आम्ही आभार मानतो’, अशी प्रतिक्रिया दौंड-पुणे-दौंड प्रवासी संघाचे सचिव विकास देशपांडे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली आहे.

नांदेड-पनवेलदरम्यान विशेष रेल्वे

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाअंतर्गत येणार्‍या नांदेड ते पनवेल स्थानकांदरम्यान विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुटीचा हंगाम व प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. नांदेड-पनवेल व पनवेल-नांदेड अशा दोन्ही बाजूंनी पुणे मार्गे रेल्वे धावेल. 07617 हजूर साहिब नांदेड-पनवेल विशेष रेल्वे दि. 5 मे ते 28 जुलै दरम्यान दर शनिवारी सायंकाळी 5.30 वाजता नांदेड येथून सुटून पनवेल येथे दुसर्‍या दिवशी सकाळी 9 वाजता पोहोचेल.तर 07618 पनवेल-हजूर साहिब नांदेड विशेष रेल्वे दि. 6 मे ते 29 जुलैदरम्यान दर रविवारी सकाळी 10 वाजता पनवेल येथून सुटून दुसर्‍या दिवशी नांदेड येथे पहाटे 5 वाजता पोहोचेल. या रेल्वेला लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डूवाडी, उस्मानाबाद, लातूर, परळी वैजनाथ, परभणी, पूर्णा येथे थांबा देण्यात आला. एक वातानुकूलित टू टियर, एक वातानुकूलित थ्री टियर, दहा स्लीपर, सहा जनरल सेकंड क्लास डबे या जोडण्यात येणार आहेत.