पर्यायी सरकारसाठी उद्या दिल्लीत खलबत्ते

Last Updated: Nov 18 2019 1:47AM
Responsive image


पुणे : प्रतिनिधी

राज्यात पर्यायी सरकार होण्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांमध्ये उद्या (दि. १८) दिल्लीत अतिशय महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

पुण्यात रविवारी सायंकाळी राष्ट्रवारी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मोदी बागेतील त्यांच्या निवासस्थानी एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पक्षाचे गटनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ आदी उपस्थित होते.

या बैठकीसंदर्भात पत्रकारांशी बोलताना नवाब मलिक म्हणाले, राज्यात सुरू असलेली राष्ट्रपती राजवट संपुष्टात आणून राज्यात पर्यायी सरकार देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात, उद्या दिल्लीत पक्षाध्यक्ष शरद पवार सोनिया गांधीची भेट घेणार आहेत. याभेटीनंतर सत्ता स्थापनेचा पेच संपुष्टात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दिल्लीतील महत्त्वपूर्ण बैठकीनंतर पुढील दिशा ठरविण्यासाठी मंगळवारी (दि. १९) एका बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.