Wed, Nov 21, 2018 22:07होमपेज › Pune › मंडळाऐवजी शिक्षण विभाग असा नवा फलक

मंडळाऐवजी शिक्षण विभाग असा नवा फलक

Published On: Jul 24 2018 1:09AM | Last Updated: Jul 23 2018 10:50PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शिक्षण मंडळ बरखास्त होऊन 14 महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील फलक बदलून ‘शिक्षण विभाग’ असा करण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रासह नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. ‘बरखास्त होऊनही शिक्षण मंडळाच्या नावाचा उल्लेख कायम; पत्रव्यवहार, नामफलक, लेटरहेडवर समितीऐवजी मंडळ अशी नोंद’ या शीर्षकाखाली ‘पुढारी’ने शुक्रवारी (दि.20) ठळक वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन मंडळ असा उल्लेख काढून ‘शिक्षण विभाग’ असा नवा फलक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आला आहे. 
तसेच, सर्व पत्रव्यवहार व कामकाजासाठी शिक्षण मंडळाऐवजी शिक्षण विभाग असा उल्लेख करण्याचे परिपत्रकही काढण्यात आले आहेत. तसा उल्लेख करण्याचा सूचना कर्मचारी व शाळांना देण्यात आले आहेत. मंडळाऐवजी विभाग अशी नोंद करण्याच्या सर्वांना सक्त सूचना दिल्या आहेत. तसेच, कार्यालयात आणि दालनात लावण्यात आलेले नामफलकामध्येही बदल करण्यात येत आहेत. 

दरम्यान, शिक्षण समितीच्या कामकाजाची पहिली सभा गुरुवारी (दि.19) झाली. शिक्षण समितीच्या सभापती प्रा. सोनाली गव्हाणे यांच्या दालनावर शिक्षण समिती असा स्पष्ट उल्लेख आहे. तसेच, त्याच्या व उर्वरित 8 सदस्यांच्या लेटरहेडवर शिक्षण समिती असा उल्लेख केला आहे. मात्र, शिक्षण विभागात तसा बदल तातडीने न झाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात होते. अखेर तब्बल 14 महिन्यांनंतर शिक्षण विभागाने मंडळऐवजी विभाग असा उल्लेख सुरू केल्याने शिक्षण क्षेत्रात व नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.