Sat, Jun 06, 2020 09:04होमपेज › Pune › शहरात नव्या १६ हजार रिक्षा

शहरात नव्या १६ हजार रिक्षा

Published On: Dec 29 2017 1:32AM | Last Updated: Dec 29 2017 12:16AM

बुकमार्क करा
पुणे : नवनाथ शिंदे

रिक्षा संख्येवर मर्यादा आणण्यासाठी केंद्र शासनाने 20 वर्षांपूर्वी परवाना वितरण बंद केले होते. दरम्यान, राज्य शासनाने या नियमात शिथिलता आणून मुक्‍त परवान्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे पाच महिन्यांत आरटीओ कार्यालयात रिक्षा परवाना मिळविण्यासाठी नव्याने 16 हजार अर्जदारांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्यापैकी 8 हजार 700 जणांना आरटीओने रिक्षाचा कच्चा परवाना वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील रिक्षांची संख्या अल्पावधीतच 61 हजारी पार करणार आहे.

शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे नागरिकांकडून  रिक्षा प्रवासास प्राधान्य दिले जाते. दरम्यान, राज्य शासनाच्या रिक्षा परवाना मुक्‍त धोरणामुळे तब्बल 16 हजारांवर रिक्षांची भर विविध रस्त्यांवर पडणार आहे. त्यामुळे परमिट असलेल्या 45 हजार जुन्या रिक्षा आणि नव्याने रस्त्यांवर येणार्‍या 16 हजार रिक्षांची संख्या 61 हजारी पार करणार आहे. रिक्षा परवाना मुक्त धोरणामुळे आरटीओ कार्यालयात 31 जुलैपासून परवान्यासाठी नागरिकांनी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुुरुवात झाली होती.

पाच महिन्यांच्या कालावधीत शहरातील अनेकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यात आला. अर्जदारापैकी 8 हजार 700 जणांना कच्चा परवाना देण्यात आला आहे. तर, उर्वरित 8 जणांच्या ऑनलाइन कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. आरटीओच्या वतीने दिवसभरात 100 अर्जदारांच्या कागदपत्रांची तपासणी करून इरादपत्र वितरित केले जात आहेत. ऑनलाइन कागदपत्रे तपासणी करून अर्जदारांच्या मोबाईलवर कच्चा परवाना मंजूर झाल्याची माहिती पाठविली जात आहे. 

राज्यातील सर्वाधिक वाहनांची संख्या असलेल्या शहरात दिवसेंदिवस दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांची भर पडत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसाला 1 हजार 161 वाहनांची नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालयात केली जात आहे. त्यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्‍न जटिल बनत चालला आहे. त्यातच नव्याने रिक्षा परवाना मिळविणार्‍या अर्जदारांचा आकडा 20 हजारांवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे वाहनांच्या प्रदूषणाची पातळी वाढल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.