Wed, Jun 26, 2019 18:13होमपेज › Pune › माओवाद्यांचा घातपाताचा कट 

माओवाद्यांचा घातपाताचा कट 

Published On: Aug 30 2018 1:58AM | Last Updated: Aug 30 2018 1:49AMपुणे ः प्रतिनिधी  

देशातील राजकीय व्यवस्था उलथून टाकण्यासाठी विविध संघटना व पदाधिकारी यांच्यावर हल्ले करण्याचे तसेच देशातील सर्वोच्च राजकीय पदाधिकारी यांना लक्ष्य करून घातपात करण्याचा कट सीपीआय माओवादी या संघटनेचे सदस्य करत असल्याचे सबळ पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे मुंबई, ठाणे, फरिदाबाद, नवी दिल्ली, हैदराबाद व रांची या शहरांमध्ये एकूण नऊ ठिकाणी छापे टाकण्यात आले. हार्डडिस्क, लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, मेमरीकार्ड, मोबाईल फोन, सिमकार्ड, तसेच गुन्ह्याशी संबंध दर्शवणारे दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत. या गुन्ह्याच्या आतापर्यंतच्या तपासात त्यांच्या विरोधातच सबळ पुरावे मिळाल्याने त्यांना अटक करण्यात आलेली आहे, असे सहपोलिस आयुक्‍त शिवाजी बोडखे व पोलिस उपायुक्‍त शिरीष सरदेशपांडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

विश्रामबाग पोलिस ठाण्यात आठ जानेवारी रोजी एल्गार परिषदेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याचा तपास करताना अटक केलेले आरोपी आणि प्रतिबंधक संघटना सीपीआय माओवादी यांच्यात संबंध दर्शविणारे विविध पुरावे तपासात मिळून आले आहेत. या तपासात एल्गार परिषदेच्या आयोजनापूर्वी सीपीआय माओवादी या बंदी घातलेल्या संघटनेकडून कबीर कला मंचच्या सदस्यांना यापूर्वी अटक केलेल्या आरोपींमार्फत एल्गार परिषदेच्या प्रसार आणि आयोजनासाठी  निधी पुरविण्यात आलेला आहे. त्यांच्यातील ई-मेल्स, पत्र, बैठकांतील ठराव आणि बंदी असलेल्या सीपीआय माओवादी संघटनेचे सदस्य आणि अटक केलेल्यांमध्ये झालेल्या कम्युनिकेशनचे पुरावे मिळाले आहेत. त्यांनी सीपीआय माओवादीच्या कार्यप्रणालीप्रमाणे ऑल इंडिया युनायटेड फ्रंट तयार करण्याचा कट रचल्याचे सबळ पुरावे जप्त इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसमधील माहितीचे विश्‍लेषण केल्यानंतर समोर आले आहे, असे त्यांनी सांगितले. 

बंदी घातलेली संघटना सीपीआय माओवादी संघटनेने त्यांच्या  रणनीतीचा भाग म्हणून देशात कायद्याने प्रस्थापित केलेली राज्यव्यस्था उलथून टाकण्याच्या दृष्टीने आणि त्या उद्देशाने अखिल भारतीय युनायटेड फ्रंटच्या माध्यमातून विविध कारवाया करण्याचा कट रचला आहे. अशा प्रकारची संघटना तयार करण्याचा ठराव सीपीआय माओवादी या संघटनेच्या ईस्टर्न रीजिनल ब्युरोच्या बैठकीत संमत झाला. त्याचा पुरावा उपलब्ध आहे. ईस्टर्न रीजिनल ब्युरो हा सीपीआय माओवादी या संघटनेचा एक भूमिगत गट आहे. या गटाचा भाग म्हणून महाराष्ट्रातही असा एक फ्रंट तयार करण्याच्या दृष्टीने पुणे येथे 31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले. 

या कटात वरावरा राव, अरुण परेरा, वर्नन गोन्सालविस, सुधा भारद्वाज व गौतम नवलखा यांचा सहभाग असल्याचा ठोस पुरावा आहे. या बेकायदेशीर कृत्यांसाठी निधी जमवणे, शहरी भागातील नक्षल केडर्सकडून तरुणांना भडकवणे, शस्त्रांची जमवाजमव करणे यांचे पुरावे जमविले आहेत. या कटात सीपीआय माओवादी संघटनेच्या वरिष्ठ सदस्यांचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे. सुरक्षा दलातील अधिकारी, कर्मचारी व निरपराध नागरिकांचा मृत्यू घडवून आणण्याच्या दहशतवादी कृत्यांमध्ये ते सहभागी आहेत. गुन्ह्याच्या तपासादरम्यान सीपीआय माओवादी संघटनेचे वरिष्ठ सदस्य, तसेच हिंसाचार घडविणार्‍या इतर बंदी असलेल्या संघटना यांचे परस्पर संबंध असल्याचे पुरावे मिळाले आहेत, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.