होमपेज › Pune › शिक्षणाबाबतची मानसिकता बदलण्याची आवश्यकता :  तावडे

शिक्षणाबाबतची मानसिकता बदलण्याची आवश्यकता :  तावडे

Published On: Jul 03 2018 1:54AM | Last Updated: Jul 03 2018 12:33AMपुणे : प्रतिनिधी 

कौशल्याधारित शिक्षणाकडे समाजाने गांभीर्याने पाहायला हवे. मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे शिक्षण घेण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. श्रमनिष्ठेची आपल्या  डोक्यातील संकल्पना चुकीची असून, सध्याच्या शिक्षण पध्दतीमुळे एका धाटणीचे विद्यार्थी तयार होत आहेत. त्यामुळे शिक्षणाबाबतची मानसिकता बदलण्याची आवश्यकता असल्याचे मत राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले. 

सिंबायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड कॉमर्सच्या (एससीएसी) तिसर्‍या पदवी प्रदान समारंभात तावडे बोलत होते. या वेळी सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ.  शां. ब. मुजुमदार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, सिंबायोसिसच्या संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हृषिकेश सोमण आदी उपस्थित होते. या पदवीदान समारंभात बी. ए. आणि बी.कॉम.च्या सुमारे पाचशे विद्यार्थ्यांना कला आणि वाणिज्य शाखेच्या पदव्या प्रदान करण्यात आल्या. कला शाखेत अनन्या दत्ता आणि वाणिज्य शाखेतून सिमरन छाबरा यांनी अग्रस्थान पटकाविले.

सिंबायोसिस विद्यापीठाने ग्रामीण भागातील शाळा-कॉलेजांना दत्तक घ्यावीत, असे आवाहन तावडे यांनी केले. जवळपास 1.3 अब्ज लोकसंख्येच्या देशापुढे नोकरीच्या संधीबाबत मोठी आव्हाने असल्याचे कुलगुरू डॉ. करमळकर म्हणाले.  डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले,  सध्या तंत्रज्ञानाची आवश्यकता असल्याने विज्ञान आणि मानवशास्त्र यांच्यात सहजीवन संबंध असणे आवश्यक आहे. सोबतच आम्हाला कवी, लेखक, इतिहासकार आणि अर्थतज्ज्ञांचीही गरज आहे.