Wed, Jul 17, 2019 12:15होमपेज › Pune › दलितांच्या संरक्षणासाठी मंत्रिपदावर राहणे गरजेचे

दलितांच्या संरक्षणासाठी मंत्रिपदावर राहणे गरजेचे

Published On: May 12 2018 1:31AM | Last Updated: May 12 2018 1:24AMकोरेगाव भीमा : प्रतिनिधी

दलितांचे संरक्षण करण्यासाठी मला मंत्रिपदावर राहणे गरजेचे आहे. दलितांवरील हल्ले रोखण्यासाठी सरकारने, विरोधकांनी तसेच समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येणे गरजेचे आहे. दलित व मराठा यांनी एकत्र येणे गरजेचे असून, यातून एक चांगला संदेश समाजात जाऊ शकतो, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्‍त केले. वाडा पुनर्वसन (ता. शिरूर) येथे पूजा सकट हिच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी रामदास आठवले आले होते, त्यानंतर ते बोलत होते. पूजा सकट हिची आत्महत्या नसून ती हत्या असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच जे कोणी या घटनेच्या संबंधित आरोपी असतील त्यांना पोलिसांनी तत्काळ अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सकट कुटुंबाचे पूर्ण संरक्षण करण्याची जबाबदारी पोलिस यंत्रणेची असून अशी घटना परत घडणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना आठवले यांनी केली. 

सुरेश सकट कुटुंबीयांचे पुणे शहरात लवकरात लवकर पुनर्वसन करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा येथे जी दंगल समाजकंटकांनी घडवून आणली, त्यामध्ये नुकसान झालेल्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. दलितांवर होणारे हल्ले हे आताचे नसून सरकार कोणाचे जरी असले तरी ते होतच आहेत. यासंदर्भात मी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायद्याखाली मिळणारी 8.25 लाख रुपयांची रक्कम सकट कुटुंबीयांना तत्काळ मिळण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे रामदास आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी शिरूरचे तहसीलदार रणजित भोसले यांनी दंगलीमध्ये झालेल्या नुकसानभरपाईची माहिती दिली. दरम्यान वाडा पुनर्वसन येथे सकट कुटुंबाची भेट घेतल्यानंतर रामदास आठवले यांनी कोरेगाव भीमा येथील दलित वस्तीला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. 

यावेळी राजेंद्र गवदे यांनी कोरेगाव भीमाच्या दंगलीची माहिती दिली. तसेच काही युवकांनी पोलिस यंत्रणेने आमच्यावर जे काही खोटे गुन्हे टाकले आहेत, ते तत्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी रामदास आठवले यांच्याकडे केली. यावेळी खा. आठवले यांच्यासोबत शिरूरचे तहसीलदार रणजित भोसले, पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, पोलिस उपनिरीक्षक गणेश वारुळे, सुरेश सकट, वसंत सकट, दिलीप सकट, जयदीप सकट, पोलिस पाटील समीर पवार, हनुमंत साठे, बाळासाहेब जानराव, शैलेंद्र चव्हाण, नवनाथ कांबळे, परशुराम वाडेकर, काका खामगावकर, डी. एम. चव्हाण, अशोक शिरोळे, लक्ष्मण शेलार आदी उपस्थित होते.     

साहेब आम्ही जगायचं कसं?

घर जाळण्यात आल आणि आता माझी बहीण पण गेली. राहायला घर नाही आणि पाहायला बहीणदेखील नाही, अशी भावना पूजा सकट हिचा भाऊ जयदीप सकट याने रामदास आठवले यांच्याकडे व्यक्त केली. आम्ही दंगलीच्या 2 महिने आधीच संरक्षणाची मागणी केली होती, परंतु आम्हाला संरक्षण देण्यात आले नसल्याने आमच्यावर ही परिस्थिती ओढवली असल्याची खंत जयदीप याने यावेळी व्यक्त केली.