Wed, Jul 17, 2019 09:58होमपेज › Pune › शेतकर्‍यांची फसवणूक होत असल्याने कडक कायद्यांची गरज :  शरद पवार  

शेतकर्‍यांची फसवणूक होत असल्याने कडक कायद्यांची गरज :  शरद पवार  

Published On: Aug 23 2018 9:26PM | Last Updated: Aug 23 2018 9:26PMपुणे : प्रतिनिधी

फळे आणि भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांकडून दिल्लीच्या बाजारपेठेत माल पाठविल्यानंतर त्याचे पैसे मिळाले नसल्याच्या तक्रारी माझ्याकडे वारंवार येत आहेत. पैसे थकविल्यासंबंधी काही शहरांचा लौकिक आहे. त्यामध्ये आता देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहराचेही नाव येत आहे. त्यामुळे शेतमाल व्यवहारात शेतकर्‍यांची फसवणूक होत असेल तर आणखी कडक कायदे करावे लागतील. त्याची काळजी घेण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे व्यक्त केले.

राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचा ५८ वा वार्षिक मेळावा त्यांच्या अध्यक्षतेखाली बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे गुरुवारी दुपारी झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संघाचे कैलास भोसले, फलोत्पादन संचालक प्र. ना.  पोकळे, माजी अध्यक्ष अशोक गायकवाड, राजेंद्र पवार, संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे, ग्रेप ग्रोअर्स फेडरेशनचे अध्यक्ष सोपान कांचन आदी उपस्थित होते. यावेळी राज्यभरातील द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जागतिक बाजारपेठेत द्राक्ष निर्यातीमध्ये भारताचा वाटा दहा टक्क्यांच्या आत असून तो वाढण्यासाठी  प्रयत्न होत आहेत. परदेशातून नवीन जातीच्या द्राक्षांसह इतरही शेतमालाच्या वाणांची आयात करताना अडचणी येत असून ही बाब खर्चिक आहे. जगामध्ये त्यांनी कष्टाने संशोधन करुन द्राक्षाच्या जाती विकसित केलेल्या आहेत. त्यावर बौध्दिक स्वामित्व हक्क म्हणून आपणाला त्याची किंमत द्यावी लागेल. जागतिक बाजारात अधिक मागणी असणार्‍या द्राक्ष वाणांची लागवड आपल्याकडे वाढविण्याबरोबर द्राक्ष निर्यातीत येणार्‍या अडचणी सोडविण्यासाठी केंद्राची अपेडा संस्था आणि केंद्रीय व्यापार मंत्रालयाची मदत होणार आहे.  द्राक्ष बागाईतदार संघाच्या पुढाकाराने केंद्रीय व्यापार मंत्री सुरेश प्रभू यांच्या समवेत संयुक्त बैठक लवकरच घेऊन निर्यातीमधील अडचणी सोडविण्यास प्राधान्य देऊ, असेही पवार यावेळी म्हणाले.

विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात कापूस उत्पादन वाढवायचे असल्याने 2000 साली तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आम्ही भेटलो होतो. त्यावेळी त्यांनी बीटी कॉटनला परवानगी दिल्याचेही पवार यांनी सांगितले. अध्यक्ष सुभाष आर्वे आणि सोपान कांचन यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केली. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. द्राक्ष स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कैलास भोसले यांनी आभार मानले.