Mon, Jan 21, 2019 09:21होमपेज › Pune › पुणे विभागात ‘कोच वॉशिंग प्लान्ट’ची आवश्यकता

पुणे विभागात ‘कोच वॉशिंग प्लान्ट’ची आवश्यकता

Published On: Dec 05 2017 1:44AM | Last Updated: Dec 05 2017 1:33AM

बुकमार्क करा

पुणे : निमिष गोखले 

पुणे रेल्वे स्थानकाचे जागतिक दर्जाच्या स्थानकात लवकरच ररूपांतर होणार असून, त्याच्या वास्तूला हेरिटेज बिल्डिंगचा दर्जादेखील दिला गेला आहे. असे असले तरीदेखील मध्य रेल्वेचा पुणे विभाग मात्र सुस्तच असून, कोणत्याही नव्या गोष्टी आत्मसात करण्याच्या मनःस्थितीत नाही. नव्या रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव असो, किंवा लोणावळा मार्गावर नव्या लोकलचे रेक मागवणे असो, पुणे विभाग कायम ढेपाळलेलाच दिसतो. विदेशात जवळपास सर्वच ठिकाणी कोच वॉशिंग प्लान्ट (रेल्वे धुण्याचा आधुनिक कारखाना) असून, देशात मडगाव, दिल्ली, कात्रा, मुंबई येथे तो आहे. मात्र पुणे विभागात अद्यापही त्याचे कोणतेही नियोजन केले नसून, ‘कोच वॉशिंग प्लान्ट’ची गरज भासण्यास आता सुररुवात झाली आहे. 

बंगळुरू मेट्रो, दिल्ली मेट्रो, मुंबई मेट्रो येथेदेखील ‘कोच वॉशिंग प्लान्ट’ आहे. हा कोच प्लान्ट ऑटोमॅटिक स्वरूपाचा असून, त्याला मनुष्यबळाची गरज नाही. केवळ पंधरा मिनिटांत 24 कोचची रेल्वे आंतर्बाह्य धुण्यात येते. वॉशिंग प्लान्टच्या चारही बाजूंना सफाईकरिता मोठाले ब्रश बसविले जातात. तेथून रेल्वे गेल्यानंतर पाण्याचा वापर करून ब्रशने टपापासून खालपर्यंत ती धुतली जाते. यामध्ये अत्यल्प पाण्याचा वापर होत असल्याने पाण्याची मोठी बचतही होते.

रेल्वे धुण्यास आजही जुनाट पद्धतीचा वापर होत असून,  पाण्याची प्रचंड नासाडी होतेे. पुणे विभागातील बहुतांश रेल्वेंची अपुर्‍या मनुष्यबळामुळे महिनोन् महिने स्वच्छताच होत नसून, यामुळे रेल्वेत घाणीचे व धुळीचे साम्राज्य पसरते. यामुळे प्रवाशांचा आरोग्याचा प्रश्‍नदेखील उपस्थित होतो. पुणे स्थानकावर प्लॅटफॉर्म नंबर एक स्वच्छ करण्याकरिता पोर्टेबल व्हॅक्युम क्लीनरचा वापर करण्यात येतो.

मात्र वॉशिंग प्लान्टसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पुणे विभागात करण्यात आल्यास प्रवाशांना चकाचक रेल्वेतून भविष्यात प्रवास करता येईल. ‘गाडी मॅन्युअली धुताना बहुतांश वेळा त्याचा टप धुतला जात नाही. यामुळे पुणे विभागात या आधुनिक कोच वॉशिंग प्लान्टची गरज असून, हा प्रकल्प त्वरित राबवण्यात यावा. रेल्वेचे अधिकारी परदेश दौरे करतात; मात्र भारतात परत येताना काहीच नवीन शिकून येत नसून, कोणतेही नवे प्रकल्प राबवताना दिसत नाहीत,’ असा आरोप रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी केला आहे.