Thu, Apr 25, 2019 17:32होमपेज › Pune › पोलिस शब्दाला पर्यायी शब्द शोधायला हवा 

पोलिस शब्दाला पर्यायी शब्द शोधायला हवा 

Published On: Dec 02 2017 8:11AM | Last Updated: Dec 02 2017 8:11AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

इंग्रजांनी केलेल्या अन्याय व अत्याचारामुळे पोलिस या शब्दाची बदनामी झालेली आहे. पोलिस म्हणजे मारहाण करणारी आणि अत्याचार करणारी व्यक्ती, असेच समजले जाते. त्यामुळे पोलिस या शब्दाला पर्यायी शब्द शोधणे गरजेचे आहे, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले आहे.

दत्त जयंतीनिमित्त श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे शुक्रवारी गुरुमहात्म्य पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री बापट बोलत होते. या सोहळ्यात डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्टचे प्रमुख विश्‍वस्त विकास वालावलकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील आणि ज्येष्ठ हृदय शल्यविशारद
डॉ. रणजित जगताप यांना बापट आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे, अशोक गोडसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

बापट म्हणाले, समाजात पोलिसांची प्रतिमा चांगली नाही. पोलिस हा आपला आधारभूत घटक आहे, असे समाजातील प्रत्येकास वाटले पाहिजे. यासाठी पोलिस शब्दास पर्याय शोधणे गरजेचे आहे.
समाजात जो सत्कार्य करतो त्याचा सन्मान होणे गरजेचे आहे. समाजात चांगले काम करणार्‍यांना आपण गुरू मानयला हवे. रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, मुंबईसह पुण्यामध्ये शिक्षण, वैद्यकीय सेवा कशा प्रकारे मिळतात, हे मी जवळून पाहिले आहे. कोणत्याही ठिकाणी वैद्यकीय सेवा आणायच्या, तर त्याकरिता भांडवल असणे आवश्यक आहे. वैद्यकीय सेवेतील आधुनिक तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक होणे गरजेचे आहे. प्रत्येक ठिकाणी सरकारी अनुदान मिळणे कठीण आहे, असेही त्यांनी सांगितले.

शिवकुमार डिगे म्हणाले, कोणत्याही संस्थेच्या विश्‍वस्तांनी त्या संस्थेपुरते मर्यादित न राहता समाजासाठी विचार करणे गरजेचे आहे. धर्मादाय आयुक्तालयाच्या माध्यमातून धर्मादाय रुग्णालय गरीब रुग्णांच्या दारी ही संकल्पना 3 डिसेंबरपासून राबविली जाणार आहे. यामाध्यमातून गरीब लोकांकडे नामांकित रुग्णालयांचे डॉक्टर पोहोचणार आहेत. प्रिया निघोजकर यांनी सूत्रसंचालन केले. अंकुश काकडे यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार यांनी आभार मानले.