होमपेज › Pune › शहरात मेजर थॅलेसेमियाचे जवळपास दीडशे रुग्ण 

शहरात मेजर थॅलेसेमियाचे जवळपास दीडशे रुग्ण 

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 08 2018 12:19AMपिंपरी : वर्षा कांबळे 

थॅलेसेमिया एक आनुवंशिक रक्‍त विकार आहे. थॅलेसेमिया इंटरमेडिया (मायनर) आणि थॅलिसेमिया मेजर असे थॅलेसेमियाचे दोन प्रकार आहे. पिंपरी -चिंचवड शहरात जवळपास 100 ते 150 मेजर थॅलेसेमिया असणारी मुले आहेत. आणि त्यापेक्षा जास्त मायनर थॅलेसेमिया रुग्ण असण्याची शक्यता आहे. दोन मायनर थॅलेसेमिया व्यक्तीपासून एका मेजर थॅलेसेमियाग्रस्त बालकाचा जन्म होतो. थॅलेसेमिया मेजर बाळ जन्माला येऊ नये यासाठी प्रत्येक व्यक्तीने विवाहपूर्व ‘एच.बी. इलेक्ट्रोफशेरेसिस’ तपासणी करणे गरजेचे आहे,अशी माहिती हिमॅटॉलॉजिस्ट डॉ. ज्ञानेश्‍वर उपासे यांनी जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त दिली. 

थॅलिसेमिया मेजर  असलेल्या  रुग्णांना नियमित रक्‍त भरावे लागते. कारण रोग्याचे शरीर पुरेसे हिमोग्लोबिन तयार करत नाही. हे सर्वांना माहिती आहे. मात्र, आजही  बर्‍याच व्यक्तींना स्वत:ला मायनर थॅलेसेमिया आहे याची माहितीच नसते. त्यामुळे दोन मायनर थॅलेसेमिया व्यक्तीपासून एका मेजर थॅलेसेमियाग्रस्त बालकाचा जन्म होतो.  थॅलिसेमिया मेजर यामध्ये आजाराची तीव्रता जास्त असते. अशा बालकांना जन्मापासूनच रक्त चढविण्याची गरज असते. मात्र, रक्त चढविणे हा तात्पुरता उपाय आहे. या रुणांना आजारातून पूर्ण मुक्ततेसाठी ‘बोन मॅरो ट्रान्सप्‍लान्ट’ ही शस्त्रक्रिया करावी लागते. तर  थॅलेसेमिया मायनरमध्ये एखाद्या व्यक्तीचे हिमोग्लोबिनचे प्रमाण हे 9 ते 10 पेक्षा कमीच असते.

अशा व्यक्तीला फार त्रास होत नाही. तो सर्वसामान्यासारखे आयुष्य जगू शकतो. त्यामुळे रक्त कमी झाल्यानंतर औषधांनी किंवा रक्त चढवून हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविले तरी फार काळ टिकत नाही. आणखी चार ते पाच महिन्यांनी व्यक्तीच्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी कमी होते. अशा व्यक्तींनी ‘एच.बी. इलेक्ट्रोफशेरेसिस’ तपासणी करणे गरजेचे असते. थॅलेसेमिया मायनर असलेल्या स्त्री आणि पुरुष यांच्या विवाहानंतर त्यांच्याव्दारे जन्मणार्‍या मुलाला मेजर थॅलेसेमियाची व्याधी होते. मेजर थॅलेसेमियाचे रुग्ण हे रक्त चढवून 25 ते 30 वर्षे जगू शकतात. आणि जर ‘बोन मॅरो ट्रान्सप्‍लांट’ ही शस्त्रक्रिया केल्यास सर्वसामान्य व्यक्तीसारखे 60 ते 70 वर्षापर्यंत त्यांचे आर्युमान वाढते. ही शस्त्रक्रिया महागडी असल्यामुळे रुग्णांस मुख्यमंत्री फंड, पंतप्रधान निधी आणि काही देणगीदार संस्थांकडून मदत केली जाते. तसेच थॅलेसेमिया रुग्णांची राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे नोंद झाल्यानंतर त्यास एक ओळखपत्र मिळते ज्याव्दारे त्याला मोफत रक्त पुरवठा केला जातो.  

तपासण्या आणि सुविधांचा आभाव 

व्यक्तीला स्वत:ला मायनर थॅलेसेमिया हे पाहण्यासाठी  एच.बी. इलेक्ट्रोफशेरेसिस तपासणी करण्यासाठी शहरामध्ये सुविधा नाही. ही तपासणी ठराविक लॅबमध्ये होत असते. तसेच हिमॅटॉलॉजिस्टसाठी वेगळा विभाग नाही. पिंपरी -चिंचवड शहरामध्ये हिमॅटॉलॉजिस्ट यांचा आभाव आहे. पुणे शहरातच फक्त सहा हिमॅटॉलॉजिस्ट आहेत. त्यापैकी पिंपरीतील डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयात थॅलेसेमिया रुग्णांसाठी एक युनिट चालविले जाते.