Mon, Apr 22, 2019 11:42होमपेज › Pune › चिंचवड मतदारसंघात पाय रोवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न

चिंचवड मतदारसंघात पाय रोवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न

Published On: Jan 25 2018 1:19AM | Last Updated: Jan 25 2018 12:29AMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक तयारीस वेग दिला आहे. सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ भाजपचे शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप यांचा बालेकिल्ला मानल्या जाणार्‍या चिंचवड विधानसभा मतदारसंघात पाय रोवण्याच्या दृष्टीने स्थायीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे यांची पक्षाच्या शहर कार्याध्यक्षपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. 

आमदार लक्ष्मण जगताप यांना राष्ट्रवादीने  स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, विधान परिषदेची आमदारकी असे भरभरून दिले; मात्र तरी त्यांनी लोकसभेला राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारून शेकापतर्फे रिंगणात उडी घेतली. या निवडणुकीत पराभवानंतर विधानसभेला विजयाचे गणित मांडत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले. त्यांना 1 लाख 23 हजार 786 मते मिळाली, तर शिवसेनेचे राहुल कलाटे यांना 63 हजार 489 आणि राष्ट्रवादीचे नाना काटे यांना 42 हजार 553 मते मिळाली. या विजयानंतर जगताप यांच्याकडे भाजपचे शहराध्यक्षपदही आले.

आ. जगताप यांनी राष्ट्रवादी सोडल्याची खंत पक्षाला आहे, त्यामुळेच चिंचवडमध्ये पाय रोवून जगतापांना आव्हान देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीनेच सांगवीतील प्रशांत शितोळे यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे यांच्या उपस्थितीत नियुक्तीचे पत्र दिले.

शितोळे हे आमदार लक्ष्मण जगताप यांचे एकेकाळचे समर्थक मानले जातात. ते तीन वेळा महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. सन 2010 ते 2011 पर्यंत ते स्थायी समितीचे सभापती होते. मागील निवडणुकीत जगताप यांनी शितोळे यांच्याऐवजी हर्षल ढोरे यांना ताकद दिल्याने शितोळे जगतापांपासून दुरावले. विधानसभेला त्यांनी राष्ट्रवादीची पाठराखण केली. 2017 च्या पालिका निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी मागितली; मात्र पक्षाने अतुल शितोळे यांना उमेदवारी दिली, त्यामुळे प्रशांत शितोळे यांनी बंडखोरी केली. तिहेरी लढतीत भाजपचे हर्षल ढोरे 9 हजार 971 मते मिळवून विजयी झाले. 

प्रशांत शितोळे 8 हजार 137 मते घेत दुसर्‍या क्रमांकावर राहिले, तर अतुल शितोळे यांना  4 हजार 906 मते मिळाली. यानंतर प्रशांत शितोळे यांनी पालिका स्वीकृत सदस्यपदासाठी फिल्डिंग लावली; मात्र काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या व पालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या भाऊसाहेब भोईर यांची वर्णी लागली, तरीही शितोळे यांनी राष्ट्रवादीचे काम सुरूच ठेवले होते, त्यामुळेच त्यांची शहर कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली.  त्यांची नियुक्ती हा चिंचवड मतदारसंघात पाय रोवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.