Sun, Mar 24, 2019 06:13होमपेज › Pune › बारामतीतच राष्ट्रवादी काँग्रेसवर कार्यकर्ते जमविण्याची नामुष्की

बारामतीतच NCPवर कार्यकर्ते जमविण्याची नामुष्की

Published On: Jun 03 2018 1:18AM | Last Updated: Jun 03 2018 8:28AMबारामती : प्रतिनिधी

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. 29 मे)आयोजित आंदोलनाकडे पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला बारामतीतच नामुष्कीला सामोरे जावे लागले होते. त्या पार्श्वभूमीवर बारामती येथे रविवारी (दि. 3) होणार्‍या कार्यकर्ता मेळाव्यासाठी गर्दी जमविण्याचे मोठे आव्हान पक्षापुढे निर्माण झाले आहे. पक्षाने बैठका घेत पद असलेल्यांवर कार्यकर्ते आणण्याची जबाबदारी दिल्याचे सूत्रांकडून समजत आहे.

येथील प्रशासकीय इमारतीसमोर राष्ट्रवादीने गत आठवड्यात इंधन दरवाढीविरोधात आंदोलन केले होते. परंतु जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य, नगरसेवक तसेच अनेक सहकारी संस्थांवर काम करणार्‍या पदाधिकारी, संचालकांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे आंदोलनाचा पुरता फज्जा उडाल्याचे  पाहायला मिळाले. वृत्तपत्रांतील बातम्यांमुळे रविवारच्या कार्यक्रमाला गर्दी जमविण्याचे आव्हान राष्ट्रवादीपुढे आहे. 

रविवारी 15 गावच्या सरपंच-सदस्यांचा सत्कार आणि कार्यकर्ता मेळावा दूध संघाच्या सभागृहात होणार आहे. त्यामुळे सहाजिकच गावागावातून लोक मोठ्या संख्येने येतील. परंतु तरीही गर्दी जमावी यासाठी राष्ट्रवादी कामाला लागली आहे. शहर राष्ट्रवादीने नगरसेवक व पदाधिकार्‍यांची बैठक घेत त्यांना ‘टार्गेट’ दिले आहे. मेळाव्याला येणार्‍यांच्या याद्या सादर करण्यासही सांगितले आहे.

आ. अजित पवार यांच्या दौर्‍यावेळी गर्दी जमते. पवार यांच्या सभेवेळी तर व्यासपीठावर बसायला जागा पुरत नाही अशी परिस्थिती निर्माण होते. परंतु त्यांची पाठ फिरताच पक्षाच्या जीवावर पदे घेणार्‍यांना पक्षाचा विसर पडतो ही बारामतीतील परिस्थिती आहे. लोकसभा, विधानसभेच्या निवडणूका आता वर्षभरावर येवून ठेपल्या आहेत. 
या रणधुमाळीतच  तालुक्यातील माळेगाव आणि सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे आ. पवार यांनाच पदाधिकारी-कार्यकर्त्यांची हजेरी घ्यावी लागणार आहे.